जम्मू-काश्मीरमध्ये `इसिस`ची घुसखोरी... दोन दहशतवाद्यांना कंठस्नान
या भागात दहशतवादी लपून बसल्याची सूचना रात्री उशिरा सुरक्षा दलाला मिळाली होती
अनंतनाग : जम्मू-काश्मीरमध्ये रमजान दरम्यान लागू करण्यात आलेलं सीजफायर संपुष्टात आल्यानंतर लगेचच 'ऑपरेशन ऑलआऊट' पुन्हा एकदा सुरू करण्यात आलंय. या भागात सुरु असलेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाला यश आलंय. यातील दोन दहशतवादी 'इसिस' या संघटनेशी संबंधीत असल्याचं समोर येतंय. या एन्काऊंटर दरम्यान एक जवानही शहीद झालाय... तसंच दोन नागरिकही यावेळी जखमी झालेत.
या भागात दहशतवादी लपून बसल्याची सूचना रात्री उशिरा सुरक्षा दलाला मिळाली होती. त्यानंतहर दहशतवाद्यांना घेरलं गेलं. सूचना मिळाल्यानंतर सुरक्षादलानं श्रीगुफवारीच्या ७-८ घरांना घेरलं आणि दहशतवाद्यांना आत्मसमर्पण करण्याचं आवाहन केलं. उत्तरादाखल दहशतावाद्यांकडून गोळीबार करण्यात आला. सुरक्षादलानं त्याला प्रत्यूत्तर देताना तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. अनंतनाग जिल्ह्यातील श्रीगुफवारा परिसरात सेनेनं तीन दहशतवाद्याना ठार केलं. यामध्ये पुलवामाचा माजिद, श्रीनगरचा दाऊद आणि भिजबिहाराचा आदिल यांचा समावेश आहे.
सूरक्षा दलातील सूत्रांच्या माहितीनुसार, इंटलिजन्सद्वारे मिळालेल्या माहितीनुसार जवळपास ६ जण या घरांमध्ये लपून बसले होते. यामध्ये इसिसच्या चार दहशतवाद्यांशिवाय पाकिस्तानमधून घुसखोरी करून आला होता. यातील दोन जण इसिसचे तर बाकीचे हिजबुलचे दहशतवादी असल्याचं समजतंय. दहशतवाद्यांसोबत अजूनही चकमक सुरूच आहे.
१७ जून रोजी सीझफायर संपल्याच जाहीर करण्यात आलं होतं. यानंतर सेनेनं राज्यात पुन्हा ऑपरेशन ऑल आऊट सुरू केलं होतं. सीझफायर संपल्यानंतर हे सेनेचं दुसरं मोठं ऑपरेशन आहे. यापूर्वी गेल्या गुरुवारी सेनेनं पुलवामाच्या त्राल भागात तीन दहशतवाद्यांना ठार केलं होतं.