अशी असेल भारताची पहिली बुलेट ट्रेन...
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानी पीएम शिंजो आबे यांनी काल अहमदाबादमध्ये बुलेट ट्रेन प्रोजेक्ट्सचे भूमिपूजन केले.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानी पीएम शिंजो आबे यांनी काल अहमदाबादमध्ये बुलेट ट्रेन प्रोजेक्ट्सचे भूमिपूजन केले. या प्रोजेक्टसाठी साधारणपणे १.०८ लाख करोड खर्च येणार असून हा प्रोजेस्ट १५ ऑगस्ट २०२२ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. यावेळी शिंजो आबे यांनी 'नमस्कार' असे हिंदीत बोलून भाषणाची सुरुवात केली आणि भारतीयांची मने जिंकली. त्याचबरोबर ते म्हणाले की, ''पुढल्या वेळेस भारत दौऱ्यावर आल्यावर बुलेट ट्रेनमध्ये बसण्याची संधी नक्की मिळेल.''
बुलेट ट्रेनच्या कार्याला गती देण्याचा भारत सरकारचा मानस आहे. सरकारकडून एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यात या प्रोजेस्टबद्दल संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. व्हिडीओत दिलेल्या माहितीनुसार बुलेट ट्रेन सुरु करताना सर्वप्रथम प्रशिक्षण संस्था चालू करणे गरजेचे आहे. वडोदरामध्ये चालू होणाऱ्या या संस्थेत सुमारे चार हजार लोकांना ट्रेनिंग दिली जाईल. त्याचबरोबर जून २०१८ मध्ये पुलाचे बांधकाम सुरु करण्यात येईल.
पीआईबीने बुलेट ट्रेनच्या प्रोजेक्टबद्दल माहिती देणारा व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा या प्रोजेक्टचा फर्स्ट लूक असून या प्रोजेक्टमधून सुमारे २० हजार लोकांना रोजगार मिळेल, असा दावा सरकार करत आहे.
बुलेट ट्रेनसाठी भारतातील सर्वात लांब बोगदा तयार करण्यात येणार असून ७ किलोमीटरचा मार्ग समुद्राखालून जाणार आहे. बुलेट ट्रेनचे रूळ जमिनीपासून सुमारे २० मीटर उंचीवर असतील. अहमदाबाद से मुंबई हे ५०८ किमीचे अंतर पार करण्यासाठी रेल्वेने साधारणपणे ७-८ तास लागतील. पण हेच अंतर बुलेट ट्रेनने २.०७ ते २.५८ तासात पूर्ण होईल.
जगातील ऑस्ट्रेलिया, बेल्जियम, चीन, फ्रान्स, जर्मनी, दक्षिण कोरिया, स्वीडन, ताइवान, तुर्की, यूनाइटेड किंगडम, अमेरिका आणि उज्बेकिस्तान या देशात हाय स्पीड ट्रेन चालू आहे. पाच वर्षांनी या यादीत भारताचे देखील नाव असेल. जगातील सर्वाधिक वेग असलेल्या ट्रेनचे नेटवर्क चीनमध्ये आहे.