भदोही : पैशांचा पाऊस, आनंदाचा पाऊस या अशा संज्ञा आपण अनेकदा वापरल्या आहेत. काल्पनिक शक्तीला जोर देत यात काही नव्या गोष्टीही जोडल्या गेल्या असतील. पण, तुम्ही कधी मासळीचा पाऊस ऐकला आहे का? पाहणं तर दूरच पण, मासळीचा पाऊस हे शब्द तर कधी ऐकलेही नाहीत अशीच अनेकांची प्रतिक्रिया. पण प्रत्यक्षात ही घटना घडली आहे. उत्तर प्रदेशातील पूर्व भागात असणाऱ्या भदोही जिल्ह्यामध्ये. जिथं सोमवारी सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस झाला आणि पावसात चक्क मासे बरसू लागले. हा सर्व प्रकार नागरिकांच्या मनात भीती निर्माण करुन गेला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याला नेमकं म्हणावं तरी काय? 
आकाशातून मासे बरसत असल्याचं पाहून अनेकांना यावर विश्वासच बसेना. हवामान तज्ज्ञही या घटनेकडे एक नवा आणि अनपेक्षित प्रकार म्हणूनच पाहत आहेत. काही लोकांच्या मते चक्रीवादळसदृश्य वाऱ्यामध्ये हवेसोबतच दबावही निर्माण झाल्यामुळं कधीकधी अशा घटना घडतात. 


अशा वेळी हवेतील दबावामुळं तलावातील मासे वारा खेचतो आणि आजूबाजूला कुठे पाऊस सुरु असल्यास अशा ठिकाणी वाऱ्यामार्फत आलेले हे मासे पडतात. ही प्रक्रिया अतिशय वेगानं होते. 


यावेळी लोकांनी काय केलं पाहा... 
भदोहीतील कंधिया फाटकापाशी असणाऱ्या यादव वस्तीजवळील हा प्रकार अनेकांच्याच भुवया उंचावत आहे. पावसातून मासे बरसत असल्याची बातमी इथं वाऱ्याच्या वेगानं पसरली. यावेळी कोणी घराच्या छतावर धाव मारली, तर कोणी शेत गाठलं. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार शेतं, घराचं छत, बागांसह इतरही अनेक ठिकाणी मासे पडले होते. या पूर्ण भागात जवळपास 50 किलो मासे पडले होते. पण ही सर्व मासळी विषारी असल्याची शक्यता वर्तवत याचा संबंध अशुभ सूचक घटनेशी जोडला जात आहे. मासळीचा पाऊ, पडल्यानंतर नागरिकांनी हे मासे तलाव आणि खड्ड्यांमध्ये टाकून दिले.