पीएफ खात्याबद्दल तुमच्या फायद्याच्या ५ गोष्टी
कर्मचारी भविष्य निधी संघटना (ईपीएफओ) ला गुंतवणुकीचा चांगला पर्याय म्हणून पाहिलं जातं.
मुंबई : कर्मचारी भविष्य निधी संघटना (ईपीएफओ) ला गुंतवणुकीचा चांगला पर्याय म्हणून पाहिलं जातं. केंद्र विश्वस्त बोर्डही प्रत्येक आर्थिक वर्षाचा व्याज दर निश्चित करतं. या आधारावरच तुमच्या खात्यात किती व्याज जमा होणार हे ठरतं. गेल्या काही वर्षांपासून व्याजदरांमध्ये कपात झाली आहे. सध्या पीएफवर मिळणारं व्याज ८.५५ टक्के आहे. सध्या खातेधारकाच्या पगारातून १२ टक्के पीएफ जातो. पीएफ मधल्या गुंतवणुकीचे आणखी काही फायदेही आहेत.
६ लाख रुपयांचा विमा
ईडीएलआय (एमप्लॉई डिपॉझिट लिंक्ड इन्श्यूरन्स) योजनेनुसार तुमच्या पीएफ खात्यावर ६ लाख रुपयांपर्यंतचा विमा मिळतो. या योजनेतून खातेधारकांना लमसम रक्कम मिळते. याचा फायदा आजारी पडलो तर, अपघात झाला तर किंवा मृत्यू झाला तर मिळतो.
निवृत्तीनंतर पेंशन
पीएफ खात्यात १० वर्षांपर्यंत नियमित रक्कम भरली तर तुम्हाला एमप्लॉई पेंशन स्कीमचाही लाभ मिळतो. कर्मचाऱ्याच्या खात्यात लागोपाठ १० वर्ष रक्कम जमा होत असेल तर त्याला एमप्लॉई पेंशन स्कीम १९९५ मधून निवृत्तीनंतर एक हजार रुपये पेंशन म्हणून मिळतील. तुमची नोकरी जेवढी जास्त होईल तेवढी ही पेंशनची रक्कम वाढत जाते.
निष्क्रीय खात्यांवरही मिळणार व्याज
ईपीएफओनं निष्क्रीय खात्यांवरही व्याज द्यायचा निर्णय मागच्या वर्षी घेतला आहे. आता अशा पीएफ खात्यांवरही व्याज मिळणार आहे जी मागच्या ३ वर्षांपासून निष्क्रीय आहेत. ३ वर्षांपर्यंत ज्या खात्यांमध्ये कोणताही व्यवहार झाला नाही ती खाती निष्क्रीय समजली जातात. आता अशा खात्यांवरही व्याज मिळणार आहे.
तुम्ही नोकरी बदलत असाल तर पीएफ खातं ट्रान्सफर करा. यामुळे तुम्हाला नियमित रकमेवर व्याज मिळेल. जर तुम्ही असं केलं नाहीत तर नियमानुसार पाच वर्षांपर्यंत खातं निष्क्रीय असेल तर पीएफ काढताना कर द्यावा लागतो.
पीएफ ट्रान्सफर आणखी सोपा
नोकरी बदलल्यानंतर पीएफ ट्रान्सफर आता आणखी सोपा झाला आहे. आधार लिंक असलेल्या तुमच्या युएएन नंबरवरून तुमचं पीएफ खातं ऑनलाईन ट्रान्सफर करता येतं.
...तर पीएफचे पैसे काढता येतात
काही परिस्थितींमध्ये तुम्ही पीएफचे पैसे काढूही शकता. घर विकत घेण्यासाठी किंवा घर बनवण्यासाठी, घराचं कर्ज फेडण्यासाठी, आजारी असाल तर, मुलांच्या उच्च शिक्षणासाठी, मुलीच्या लग्नासाठी पीएफची रक्कम काढता येते. पण यासाठी खातेधारकांना एका निश्चित वेळेपर्यंत ईपीएफओ सदस्य असणं गरजेचं आहे.