Assembly Elections 2018 : भाजपच्या पराभवाला फिल्मी तडका, नेटकरी म्हणतात....
कोणी हा जनतेचा विजय म्हटलं, तर कोणी याला संतापाचं नाव दिलं.
मुंबई : Assembly Elections. २०१९ मधील लोकसभा निवडणूकांची उपांत्य फेरी म्हणून पाहिल्या जाणाऱ्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणूकांचे निकाल आता हाती आले आहेत. हिंदी पट्ट्यातील राज्यांमध्ये असणारा सत्ताधारी भाजपाचा प्रभाव कमी झाला असून, त्या ठिकाणी काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पक्षाला चांगलाच धक्का दिल्याचं पाहायला मिळालं.
विरोधी पक्षांकडून भाजपाला मिळालेली टक्कर पाहता सोशल मीडियावर या विषयीच्या बऱ्याच चर्चांना उधाण आलं. कोणी हा जनतेचा विजय म्हटलं, तर कोणी याला संतापाचं नाव दिलं.
फुकाच्या घोषणा, आश्वासनं पूर्ण न केल्यामुळेच कमळ फुलण्याआधीच त्याच्या अस्तित्वाला धोका असल्याची जाणिव झाल्याचं मतही अनेकांनीच मांडलं. या साऱ्यामध्ये नेटकऱ्यांची कलात्मकता कशी बुवा मागे राहिल?
देशाच्या राजकीय पटलावर होणारी ही उलथापालथ आणि प्रचंड वेगाने होणाऱ्या हालचाली पाहता नेटकऱ्यांनी या साऱ्याकडे विनोदी अंगाने पाहत अनेक मीम्स शेअर करण्यास सुरुवात केली.
राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या वाट्याला आलेलं हे यश पाहता सोनिया गांधी या सध्या 'कभी खुशी कभी गम' या चित्रपटातील जया बच्चन यांच्याप्रमाणेच आनंदात असतील अशा आशयाचं ट्विट करत चित्रपटातील तितक्याच भागाचा व्हिडिओ एका युजरने पोस्ट केला.
'गँग्स ऑफ वासेपूर', 'सेक्रेड गेम्स'मधील संवादांची मदत घेतही अनेकांनीच या वातावरणाला एक वेगळं आणि तितकंच विनोदी वळण दिलं. मुख्य म्हणजे एकिकडे निवडणूकांचे निकाल ट्रेंडमध्ये असतानाच दुसरीकडे अनेकांनीच हे मीम्सही शेअर करण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे खऱ्या अर्थाने निवडणूक निकालांना फिल्मी तडका मिळाला असं म्हणायला हरकत नाही.