नवी दिल्ली : पावसाळ्यात सगळ्यात जास्त धोका हा पहाडी भागातील राज्यांना असतो. उत्तर भारतातील काही भागात सातत्याने होत असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी दरड कोसळून रस्ते बंद झाले आहेत. डोंगरांवरून दरड कोसळण्याचे प्रमाण वाढत आहे तर एकीकडे नद्यांना पूर आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 


हिमाचल प्रदेशात लाहोर स्पिती मध्ये झालेल्या अतीवृष्टीनंतर उदयपूर मधील मयार घाटात ढगफुटी झाल्याने धोका वाढला आहे. अतीवृष्टी झाल्याने नदीच्या पात्रात अधिक वाढ झाली आहे. मयार घाटात झालेल्या ढगफुटीमुळे एक बाईक आणि पूल पाण्यासोबत वाहून गेला आहे.


 


करपट गावातील ग्रामस्थांनी सांगितले की, मंगळवारी संध्याकाळी नाल्याच्या बाजूने प्रचंड गडगडाट ऐकू आला. आवाजावरून गावकऱ्यांच्या पटकन लक्षात आले की ढगफुटी झाली आहे. त्यामुळे ते सतर्क झाले आणि कोणतेही नुकसान होण्यापासून बचावले. परंतु, पूल वाहून गेल्याने करपट गावातील २० कुटुंबाशी संपर्क तुटला आहे.



उत्तर भारतातील अतिवृष्टीमुळे नद्यांच्या पाण्याची पातळी सातत्याने वाढत आहे. तसंच त्यामुळे जनजीवन देखील विस्कळीत झाले आहे. दरड कोसळणे, पूर यांच्या घटनेत सातत्याने वाढ होत आहे. त्याचबरोबर धो धो पडणाऱ्या पावसामुळे हिमाचल प्रदेशात चार लोकांचा मृत्यू झाला आहे तर अनेक लोक जखमी झाले आहेत. शिमलामधील सुमारे १०० मार्ग बंद झाले आहेत. शिमलामधील ७८, रामपूरमधील ३३, रोहडूमधील ३२, मंडीमधील २२ आणि कांगडा भागातील १० पेक्षा अधिक रस्ते बंद झाले आहेत.