बागपत : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान सुरु झालं आहे. २० राज्यांमधील ९१ जागांसाठी आज मतदान होत आहे. नोएडा, मेरठ, नागपूरमध्ये मतदारांमध्ये उत्साह पाहायला मिळाला. लोकं सकाळपासूनच मतदान करण्यासाठी रांगा लावत आहेत. पण बागपतमध्ये मात्र मतदारांचं स्वागत अनोख्या पद्धतीने करण्यात आलं. येथे मतदारांवर फुलांचा वर्षाव करत त्यांचं स्वागत करण्यात आलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ढोल वाजवत स्वागत


बागपतमधील बड़ौत येथे मतदान केंद्र १२६ वर मतदारांचं स्वागत फुलांचा वर्षाव करत करण्यात आलं. तसेच येथे ढोल वाजवतही मतदारांचं स्वागत करण्यात आलं.



पंतप्रधानांचं मतदान करण्याचं आवाहन


मतदान सुरु होण्य़ाआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील लोकांना मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. पंतप्रधानांनी ट्विटरच्या माध्यमातून हे आवाहन केलं आहे. लोकशाही या उत्सवात भाग घेण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. आधी मतदान मग जलपान असं देखील त्यांनी म्हटलं आहे.


दीड कोटी मतदार बजावणार हक्क


पहिल्या टप्प्यातील मतदानात जवळपास दीड कोटी मतदार आपला हक्क बजावणार आहे. यामध्ये ८२,२४,००० पुरुष आणि ६८,३९,००० महिला आहे. पहिल्या टप्प्यात ६७१६ मतदान केंद्र आणि १६,५८१ मतदान स्थळ आहेत. मतदानाच्या ठिकाणी चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.


अनेक दिग्गज रिंगणात


पहिल्या टप्प्यातील मतदानात केंद्रीय मंत्री जनरल वीके सिंह (गाजियाबाद), महेश शर्मा (गौतम बुद्ध नगर) रालोदचे प्रमुख अजित सिंह (मुजफ्फरनगर) आणि त्यांचा मुलगा जयंत चौधरी (बागपत), केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (नागपूर) रिंगणात आहेत.