नवी दिल्ली: नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून शनिवारी संसदेत २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. यावेळी निर्मला सीतारामन यांनी सर्वसामान्यांच्यादृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या Income Tax (प्राप्तीकर) नव्या स्लॅबची घोषणा केली. त्यानुसार पाच लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना कोणताही कर लागणार नाही. तर ५ लाख ते ७.५ लाख रुपये वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना १० टक्के कर भरावा लागेल. यापूर्वी या टप्प्यातील करदात्यांना २० टक्के कर भरावा लागत होता. 


याशिवाय, ७.५ लाख ते १० लाख रुपये उत्पन्न असणाऱ्या करदात्यांना २० टक्क्यांऐवजी १५ टक्के इतका कर भरावा लागणार आहे. तर १० ते १२.५ लाख रुपये उत्पन्न असणाऱ्यांना २० टक्के कर भरावा लागेल. यापूर्वी हा दर ३० टक्के इतका होता. तर १५ लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्यांना ३० टक्के कर भरावा लागेल.