नवी दिल्ली : चारा घोटाळ्यातील एका प्रकरणात दोषी ठरलेले राजदचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांना आज(गुरुवारी) शिक्षा सुनावली जाणार आहे. सीबीआयच्या विशेष कोर्टात लालूंसह १५ दोषींना शिक्षा सुनावली जाणार आहे. 


आज होणार शिक्षा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सकाळी लालू प्रसाद यादव व इतर दोषी रांचीच्या सीबीआय विशेष कोर्टात हजर झाले होते. मात्र वकील विंदेश्वरी प्रसाद यांचं निधन झाल्याने या शिक्षेवरील सुनावणी एक दिवस पुढे ढकलण्यात आली होती. 


काहींना कोर्टाच्या अवमानाची नोटीस


तर दुसरीकडे न्यायालयाने याप्रकरणी तेजस्वी यादव, रघुवंशप्रसाद सिंह, शिवानंद तिवारी आणि मनीष तिवारी यांना कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी नोटीस बजावलीय. कोर्टाच्या निर्णयाविरोधात वक्तव्ये केल्याप्रकरणी ही नोटीस बजावण्यात आलीय. लालू प्रसाद यादव सध्या रांचीच्या बिरसा मुंडा तुरुंगात आहेत. लालू यादव यांना कोर्टात काय शिक्षा सुनावली जाणार, याकडे सा-यांचं लक्ष लागलंय.


लालूंसह १६ जण दोषी


लालू यांच्यासहीत १६ जणांना २३ डिसेंबरला सीबीआयच्या विशेष न्यायालयाने चारा घोटाळ्यात दोषी ठरवले होते. पोलिसांनी त्याच दिवशी सर्वांची रवानगी रांची येथील बिरसा मुंडा सेंट्रल कारागृहात केली होती. 


काय होते आरोप?


सीबीआय विशेष न्यायालयाने लालू यादव यांना फसवणूक करणे, कट रचणे आणि भ्रष्टाचाराच्या आरोपा कलम ४२०, १२०-बी आणि पीसी अ‍ॅक्ट १३(२) नुसार दोषी ठरवले होते. १९९४ ते १९९६ दरम्यान देवघर जिल्हा कोषागारातून ८४.५ लाख रूपये काढले गेले होते. 


सीबीआयने या प्रकरणात देवघर कोषागारातून खोटी बिल सादर करून पैसे काढण्यात आल्याचा आरोप सर्वांवर लावला होता. लालू प्रसाद यांच्यावर या प्रकरणाची माहिती असूनही याला आळा न घालण्याचा आरोप आहे. 


लालूंना धक्का...


२३ डिसेंबरला रांचीच्या विशेष सीबीआय न्यायालयात लालूंच नाव पुकारण्यात आल्यावर त्यांनी कटघ-यात येऊन हात वर करून हजेरी दिली. त्यानंतर न्यायालयाने त्यांना दोषी ठरवल्यावर ते सुन्न झाले होते. त्यानंतर डॉक्टर साहेब(जगन्नाथ मिश्र) ला सोडलं मला शिक्षा दिली...अजबच केलं...