नवी दिल्ली : बिहारमधल्या बहुचर्चित चारा घोटाळ्याशी संबंधित तीन प्रकरणांवर दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास रांचीच्या विशेष सीबीआय कोर्टात निकाल सुनावला जाणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव यांच्याशी हा घोटाळा संबंधित असल्याने कोर्टाच्या निर्णयाकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. लालूप्रसाद यादव हे पुत्र आणि माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यासह कोर्टात पोहोचले. देवघर तिजोरीतून अवैधरित्या 90 लाख रुपये काढल्याच्या प्रकरणात निर्णय सुनावला जाणार आहे. 


लालूप्रसाद यादव आणि जगन्नाथ मिश्र यांच्यासह एकूण 22 आरोपी या प्रकरणात आहेत. रांचीच्या विशेष सीबीआय कोर्टात या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झालीय. दरम्यान भाजपनेच आपल्याला या घोटाळ्यात गोवल्याचा आरोप लालूंनी केला. असं असलं तरी न्याय व्यवस्थेवर आपला विश्वास असून घोटाळ्यातून सुटका होईल असं लालूंनी म्हटलंय. मात्र या प्रकरणी कोर्टात लालू दोषी ठरल्यास त्यांची रवानगी जेलमध्ये होण्याची शक्यता आहे.


1996च्या दरम्यान, बिहारमधील चारा घोटाळ्याने देश हादरून गेला. लालू प्रसाद यादव हे या घोटाळ्यातील प्रमुख आरोपींपैकी एक आहेत. या घोटाळ्यामुळे लालू अनेकदा तुरूंगातही जाऊन आले आहेत. तसेच, त्यांना आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामाही द्यावा लागला होता.