नवी दिल्ली : तुम्ही रेल्वे प्रवासात रेल्वे कॅटरींग सेवेच्या माध्यमातून देण्यात येणारे अन्न खाण्या लायक नसल्याची बाब उघड झालेय. अनेकवेळा प्रवाशांकडून अन्नाबाबत तक्रारी येत होत्या. मात्र, रेल्वे प्रशासनाकडून याची दखल  घेण्यात आलेली. दरम्यान, कॅगच्या अहवालाने त्यावर  शिक्कामोर्तब करण्यात आलेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय रेल्वेच्या कॅटरींग सेवेचा लेखाजोखा कॅगने तपासला आणि तसा अहवाल शुक्रवारी संसदेला सादर केलाय. या रिपोर्टनुसार रेल्वे स्टेशन आणि रेल्वे कॅटरिंगमध्ये पुरवले जाणारे अन्नपदार्थ मानवाला खाण्यालायक नाहीत, असे स्पष्ट करण्यात आलेय. 


या अहवालानुसार, रेल्वे आणि रेल्वेस्थानकांमध्ये विकले जाणारे खाद्यपदार्थ प्रदूषित आहेत. डबाबंद आणि बाटलीबंद खाद्यपदार्थ-पेये यांची वापराची तारीख संपली तरी सर्रास याची विक्री होतेय. तसेच अनधिकृत ब्रँडच्या पाण्याच्या बाटल्याही विकल्या जात आहेत. मात्र, याकडे डोळेझाक होत आहे. रेल्वेची रेल नीर पाणी उपलब्ध होत नाही. याचीही गंभीर दखल प्रशासन घेत नाही.


- कॅगने तब्बल ७४ रेल्वेस्थानके आणि ८० ट्रेन्सची तपासणी केली. या तपासणीत काही धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. 


- रेल्वे परिसरात आणि ट्रेनमध्ये साफसफाई केली जात नाही. याखेरीज ट्रेनमध्ये विकल्या जाणाऱ्या वस्तूंचा दर्जा अतिशय  खालावलेला आहे.  वस्तू खरेदीनंतर साधे बिलही दिले जात नाही. 



- कचराकुंड्या झाकून ठेवल्या जात नाहीत. पेय तयार करण्यासाठी अशुद्ध पाण्याचा वापर केला जातोय.


- खाद्यपदार्थ उघड्यावर ठेवणे, अन्नामध्ये उंदीर किंवा झुरळे सापडणे अशा अनेक गोष्टींचा समावेश आहे.


- रेल्वेच्या ट्रेनमध्ये पुरवल्या जाणाऱ्या कॅटरिंग सेवेमध्ये मेन्यू कार्ड नसणे, खाद्यपदार्थांचं प्रमाण कमी असणे, ठरलेल्या किमतीपेक्षा जास्त किमतीला खाद्यपदार्थ विकणे अशा अनेक समस्यांचा आढावा अहवालात घेण्यात आला आहे. 


- भारतीय रेल्वे आपल्या सेवेमध्ये बेस किचन, ऑटोमॅटिक वेंडिंग मशीन अशा प्राथमिक सुविधा देण्यात अपयशी ठरल्याचे कॅगने अधोरेखित केलेय.