लखनऊ: धार्मिक विद्वेषाच्या अनेक घटनांनी देश पोळून निघत असताना मेरठमध्ये हिंदू-मुस्लिम ऐक्य अबाधित राखण्याच्यादृष्टीने आश्वासक चित्र पाहायला मिळत आहे. सध्या उत्तर प्रदेशात कावड यात्रेचा उत्सव सुरु आहे. अनेक वर्षांपासून ही परंपरा सुरु असल्याने या उत्सवाला उत्तर प्रदेशात खूप महत्त्व आहे. मात्र, यावरुन विहिंपच्या साध्वी प्राची यांच्यासारखे नेते धार्मिक विद्वेषाला खतपाणी घालण्याचा प्रयत्न करत आहेत. साध्वी प्राची यांनी नुकतीच कावड यात्रेदरम्यान मशिदीवरील भोंगे बंद करण्याची मागणी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे केली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र, मेरठमधील सामान्य लोकांनी राजकारण्यांच्या या चिथावणीला बळी न पडता स्वागतार्ह पाऊल उचलले आहे. येथील घंटानगर परिसरातील मांसाहारी हॉटेल मालकांनी कावड यात्रेदरम्यान केवळ शाकाहारी पदार्थच हॉटेलात ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.


त्यामुळे कावड यात्रेकरुंना जवळपास प्रत्येक हॉटेलात पनीर बिर्यानीचा आस्वाद घेता येणार आहे. 


राजकीय नेते कायमच हिंदू आणि मुस्लिमांमध्ये दुही निर्माण करण्याचा प्रयत्न करतात.


मात्र, एक चांगला समाज निर्माण करण्यासाठी हिंदू व मुस्लिमांनी एकत्र राहून शांतता राखण्याची गरज आहे. माझ्या हॉटेलमधील आणि घरातील अनेक वस्तू मी हिंदू बांधवांकडून विकत घेतो. तेव्हा धार्मिक दुहीचा प्रश्न येतोच कुठे, असा प्रश्न अब्दुल रेहमान या हॉटेल मालकाने उपस्थित केला.