मुंबई : केदारनाथ धाम हे अनेक श्रद्धाळूंचं श्रद्धास्थान. संपूर्ण आयुष्यात एकदातरी या पावन भूमीला भेट देण्याचा अनेकांचाच मानस असतो. अशा या श्रद्धास्थळी दरवर्षीप्रमाणे यंदाही बऱ्याच भाविकांनी गर्दी केली होती. मुख्य म्हणजे यंदाचं हे वर्ष संपूर्ण आयोजक मंडळासाठी आणि भाविकांसाठी आनंदाचं ठरलं असं म्हणायला हरकत नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केदारनाथच्या भाविकांसाठी आणि इथे येणाऱ्या प्रत्येक यात्रेकरुसाठी ही एक आनंदाचीच बाब आहे. यंदाच्या वर्षीच्या यात्रेतून केदारनाथमध्ये एक प्रकारच्या विक्रमाचीच नोंद झाली आहे, असं म्हणायला हरकत नाही.


कोणत्याच प्रकारची जीवित हानी अथवा मोठी दुर्घटना यंदाच्या वर्षात झाली नसून यात्रा निर्विघ्नपणे पार पडल्याची माहिती समोर येत आहे. 


केदारनाथ यात्रेच्या स्थानिक व्यवस्थापन मंडळातर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार अतिशय खडतर वाट असणाऱ्या या यात्रास्थळाजवळ यावेळी कोणत्याच जीवित हानी अथवा मोठं संकट न आल्याचं सांगण्यात आलं. मुख्य म्हणजे पावसाच्या महिन्यांमध्येही यात्रेत अपेक्षित अडथळे आले नसल्याची माहितीही त्यांच्याकडून मिळाली. 


यंदा आयोजकांकडून बाळगण्यात आलेली सतर्कता आणि संकटांच्या प्रसंगावेळी योजलेल्या उपाययोजना ही सारी यंत्रणा तयार असल्याचंही सांगण्यात आलं. काही प्रमाणात हवामानामुळे यात्रा थांबवण्यात आली होती. पण, ही एक गोष्ट वगळता इतर संकटं यंदाच्या वर्षी दूर असल्यामुळे आयोजकांमध्ये आनंद आणि उत्साहाचं वातावरण आहे. 


दरवर्षीप्रमाणे यंदाच्याही वर्षी केदारनाथ या धार्मिक स्थळी भक्तांची गर्दी पाहायला मिळाली होती. यंदा जवळपास सात लाखांहून अधिक भाविकांनी या ठिकाणी भेट दिल्याचं स्पष्ट होत आहे.