Forbes: जगातील सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीत 3 भारतीय, प्रत्येकाला वाटेल अभिमान!
Forbes 2024: फोर्ब्सच्या यादीमध्ये उद्योग, मनोरंजन, राजकीय, सामाजिक सेवा आणि धोरणकर्त्यांची नावाचा समावेश आहे.
Forbes 2024: 2024 वर्ष संपायला आले आहे. या वर्षात जगभरात विविध क्षेत्रात मोठमोठ्या घटना घडल्या. अनेकजणांचे नेतृत्व पुढे आले. या सर्वात फोर्ब्सच्या यादीकेड संपूर्ण जगाचे लक्ष असते. आपापल्या क्षेत्रात दमदार कामगिरी करणाऱ्या जगभरातील प्रभावी स्त्री-पुरुषांची यादी फोर्ब्सकडून जाहीर केली जाते. या यादीत किती आणि कोणते भारतीय आहेत? याबद्दलही नागरिकांच्या मनात उत्सुकता असते. दरम्यान फोर्ब्सने 2024 सालासाठी जगातील सर्वात शक्तिशाली महिलांची यादी जाहीर केली आहे. आनंदाची बाब म्हणजे जगभरातील शक्तिशाली महिलांच्या यादीत 3 भारतीय महिलांचा समावेश आहे. फोर्ब्सच्या यादीमध्ये उद्योग, मनोरंजन, राजकीय, सामाजिक सेवा आणि धोरणकर्त्यांची नावाचा समावेश आहे. फोर्ब्सने यंदा म्हणजेच 2024 ला आपली 21वी यादी जाहीर केली. या यादीत तीन भारतीय महिलांच्या नावांचाही समावेश आहे. आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या या भारतीय महिला कोण आहेत? त्यांची कामगिरी काय? सर्वकाही जाणून घेऊया.
निर्मला सीतारामन
फोर्ब्सच्या सर्वात शक्तिशाली यादीत भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन 28व्या क्रमांकावर आहेत. निर्मला सीतारामन या केंद्रीय अर्थमंत्री आहेत. भारत सरकारचे आर्थिक धोरण ठरवण्यात त्यांचा महत्वाचा सहभाग असतो. निर्माला सितारमण यांनी मे 2019 मध्ये केंद्रीय अर्थमंत्री म्हणून पदभार स्वीकारला आणि तेव्हापासून त्या या महत्त्वाच्या पदावर आहेत. भारताचा वेगवान आर्थिक विकास राखण्याची जबाबदारी निर्मला सीतारामन यांच्याकडे आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली भारत पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था होण्याच्या मार्गावर आहे. निर्मला सीतारामन यांनी महिला सक्षमीकरणाबाबत आवाज उठवला आहे. राजकारणात येण्यापूर्वी सीतारामन या ब्रिटनच्या कृषी अभियंता संघटना आणि बीबीसी वर्ल्डशी संबंधित होत्या.
रोशनी नाडर मल्होत्रा
आघाडीच्या IT कंपनी HCL Technologies च्या चेअरपर्सन आणि HCL कॉर्पोरेशनच्या सीईओ रोशनी नाडर मल्होत्रा यांना फोर्ब्सच्या सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीत 81 वे स्थान मिळाले आहे. रोशनी नाडर या $12 अब्ज कंपनीचे धोरणात्मक निर्णय घेतात. रोशनी नाडर मल्होत्रा या शिव नादर फाउंडेशनच्या विश्वस्त असून त्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहेत. रोशनी नाडर यांनी निसर्ग संवर्धनासाठी काम करणाऱ्या द हॅबिटेटस ट्रस्टची स्थापना केली आहे.
किरण मुझुमदार शॉ
फोर्ब्सच्या सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीत किरण मुझुमदार शॉ 82 व्या स्थानावर आहे. किरण मुझुमदार या बायोटेक कंपनी बायोकॉनचे संस्थापक आणि चेअरपर्सन आहेत. बायोटेक कंपनी आज अमेरिका आणि आशियातील विविध बाजारपेठांसह जगभरात पोहोचली आहे. किरण मुझुमदार शॉ या भारतातील सर्वात यशस्वी उद्योगपतींपैकी एक आहेत. 2019 मध्ये किरण मजुमदार आणि त्यांचे पती जॉन शॉ यांनी ग्लासगो विद्यापीठात कर्करोग संशोधनासाठी $7.5 दशलक्ष देणगी दिली. शॉची कंपनी कोरोना व्हायरसच्या अँटीबॉडी थेरपीवरही काम करतेय.
फोर्ब्सच्या शक्तिशाली महिलांच्या यादीत भारतीय महिलांचे नाव असणे हे प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची बाब आहे. पण येणाऱ्या वर्षात नावांमध्ये वाढ व्हायला हवी, अशी इच्छा व्यक्त होतेय.