नागिणीची हत्या करुन तिची 80 अंडी जमिनीत पुरली अन् नंतर...; वन विभागाचे अधिकारीही चक्रावले
Crime News: नागिणीची हत्या करुन तिची 80 अंडी जमिनीत पुरल्याप्रकरणी वन विभागाने केलेल्या तक्रारीनंतर आरोपींविरोधात कारवाईला सुरुवात झाली आहे. याप्रकरणी आरोपींना 3 ते 7 वर्षांची शिक्षा होऊ शकते. तसंच किमान 1 लाखाचा दंड ठोठावला जाऊ शकतो.
Crime News: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) मुजफ्फरनगर (Muzaffarnagar) येथे मंगळवारी आबाद नावाच्या एका व्यक्तीच्या घरी साप (नागीण) दिसल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. यानंतर त्याने गावकऱ्यांसोबत मिळून नागिणीची हत्या केली. नागिणीची हत्या केल्यानंतर आबादच्या घऱी 80 अंडी सापडली तेव्हा ग्रामस्थ घाबरले होते. सोशल मीडियावर याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. यामध्ये एका बादलीत नागीण दिसत असून तिच्या अवतीभोवती 80 अंडी आहेत.
चारथालपूर येथील हाजीपूर गावात ही घटना घडली आहे. नागिणीची हत्या केल्यानंतर तिची 80 अंडी जमिनीत पुरण्यात आली होती. वनविभागाने याची दखल घेतली असून आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. काही ग्रामस्थांनी मोबाइलमध्ये सर्व घटनाक्रम कैद केला होता. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर वनविभागाने याची दखल घेतली होती. यानंतर वनविभागाने आबाद याच्यासह दोन अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करत कारवाईला सुरुवात केली होती.
वन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या नागिणीची मारण्यात आलं, तो धामन प्रजातीचा साप होता. याला रेट स्नॅक असंही म्हणतात. धामन साप वन्यजीव संरक्षण कायदा 1972 अंतर्गत अनुसूची दोनमध्ये येतो. त्याची हत्या केल्यास कलम 9 अंतर्गत शिकार आणि कलम 51 अंतर्गत कायदेशीर कारवाई करता येते.
मुजफ्फरनगरचे वन अधिकारी विमल किशोर भारद्वाज यांनी याप्रकरणी अधिक माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलं की, आम्हाला एका खबऱ्याकडून या घटनेची माहिती मिळाली. हाजीपूर गावात एका सापाला मारण्यात आलं असून त्याची अंडीही असल्याचं आम्हाला समजलं होतं. 80 अंडी असून त्याचा फोटोही आम्हाला मिळाला होता.
कायद्यानुसार काय कारवाई होऊ शकते?
सापाला मारणं हा गुन्हा आहे. वन्यजीव संरक्षण कायदा 20-22 च्या दुरुस्तीनुसार असा गुन्हा केल्या 3 ते 7 वर्षांची शिक्षा आणि किमान 1 लाख दंडाची तरतूद आहे, हा कायदा नुकताच संसदेत मंजूर झाला आहे. त्यामुळे पोलिसांकडे अद्याप त्याची सविस्तर माहिती आलेली नाही. त्यामुळे अशा स्थितीत 3 ते 7 वर्षांची शिक्षा आणि किमान 10 हजार दंड होऊ शकतो.