अयोध्येत शास्त्रीयदृष्ट्या `राम` शोधणारा `मोहम्मद`
मोहम्मद यांनी अयोध्येत राम मंदिराच्या पुराव्यांबाबत केलेल्या वक्तव्यामुळं त्यांच्यावर खात्यांतर्गत कारवाईही झाली पण...
अयोध्या : बाबरी मशीद मंदिराच्या अवशेषांवर बनवली गेली हे पहिल्यांदा अधिकृतरित्या सांगितलं पुरातत्व खात्याच्या के के मोहम्मद यांनी... त्यांच्या शोधामुळे राममंदिराच्या पक्षकारांना मोठं बळ मिळालं. कामाला देव मानणारे, कामावर पूर्ण निष्ठा असणारे के के. मोहम्मद... याच के के मोहम्मद यांनी बाबरी मशिदीच्या चौथऱ्याखाली हिंदू मंदिराचे अवशेष असल्याचं जगासमोर आणलं होतं.
पुरातत्व विभागाच्या के बी बी लाल यांच्या नेतृत्वाखाली ज्या पथकानं १९७६ साली बाबरी मशीदीच्या परिसरात उत्खनन केलं होतं त्या पथकात के के मोहम्मद होते. मोहम्मद त्यावेळी 'दिल्ली स्कूल ऑफ आर्किओलॉजी'चे विद्यार्थी होते. त्यावेळी पहिल्यांदा त्यांनी राम मंदिराचं अस्तित्व असल्याचं ठासून सांगितलं होतं.
ज्यावेळी मोहम्मद यांनी उत्खनन केलं त्यावेळी मशिदीच्या खांबांखालचा भाग विटांनी तयार केला होता हे दिसलं. शिवाय मशिदीच्या भितींत मंदिराचे स्तंभ स्पष्टपणे दिसल्याचं त्यांनी सांगितलं. मंदिराते ते खांब काळ्या बेसॉल्ट दगडापासून बनवले होते. स्तंभाच्या खालील भागात अकराव्या आणि बाराव्या शतकातील मंदिरांची चिन्हं स्पष्ट होती. के के मोहम्मद यांनी अयोध्येत राम मंदिराच्या पुराव्यांबाबत केलेल्या वक्तव्यामुळं त्यांच्यावर खात्यांतर्गत कारवाईही झाली. पण ते त्यांच्या निरीक्षणावर ठाम राहिले.
बाबर इस्लामच्या कोणी मोठ्या संस्थापकांपैंकी नव्हता. निझामुद्दीन अवलिया किंवा ख्वाजा मोईनुद्दीन चिस्तींसारखाही नव्हता. त्यामुळं बाबर मुस्लिमांसाठी महत्त्वाचा नव्हता. हिंदूंसाठी ती जागा महत्त्वाची होती. पुरातत्व विभागानं दिलेले पुरावे कोर्टानं ग्राह्य धरले. आता त्या ठिकाणी भव्य मंदिर व्हायला पाहिजे, असं मत के के मोहम्मद यांनी अयोध्या प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर दिलंय.
कामाप्रती त्यांची निष्ठा कधीही ढळली नाही. शास्त्रीयदृष्ट्या अयोध्येत राम शोधणारा माणूस अशी त्यांची ओळख कायम राहील.