मोदी यांची फारूख अब्दुल्ला, ओमर अब्दुल्ला यांनी घेतली भेट
अब्दुल्ला यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूख अब्दुल्ला आणि ओमर अब्दुल्ला यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. राज्यात निवडून आलेलं सरकार जाऊन दीड वर्षं उलटल असताना आता या वर्षअखेर निवडणुका घ्याव्यात, अशी विनंती अब्दुल्ला पिता-पुत्रांनी पंतप्रधानांना केली.
या निवडणुकीनंतर जो काही जनादेश येईल तो मान्य असेल, मात्र जनतेला आता सरकार हवं आहे असं अब्दुल्लांनी म्हटलंय. यावेळी जम्मू-काश्मीरमधली परिस्थितीही आपण पंतप्रधानांच्या कानी घातल्याचे त्यांनी सांगितलं.
या दरम्यान दोघांमध्ये काश्मीरच्या सद्यस्थितीवर चर्चा झाली. मोदींच्या भेटीनंतर नॅशनल कॉन्फरन्सचे नेते उमर अब्दुल्ला यांनी माहिती दिली. आम्ही पंतप्रधान मोदींना सांगितले, राज्यात असे कोणतेही पाऊल उचलू नका, ज्यामुळे परिस्थिती बिघडेल. गेल्या काही दिवसांपासून खोऱ्यात तणाव निर्माण झाला होता. आम्हाला त्याबद्दल त्यांना जाणीव करून द्यायची होती. तसेच आम्ही जम्मू-काश्मीरमध्ये निवडणुका घेण्याची मागणी केली आहे. कलम 35 ए आणि 370 चा मुद्दा उपस्थित केला. यात कोणतीही छेडछाड करु नये, असेही आम्ही त्यांना सांगितले आहे.