Sharmishtha Mukherjee : गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावरुन लैगिंक छळासारखे गुन्हे घडत असल्याचे समोर येत आहे. असंच एक प्रकरण माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची मुलगी शर्मिष्ठा मुखर्जी यांच्यासोबतही घडलं आहे. माजी राष्ट्रपती आणि काँग्रेसचे दिवंगत नेते प्रणव मुखर्जी यांची मुलगी शर्मिष्ठा मुखर्जी यांनी राहुल गांधी यांचे समर्थक त्यांना सोशल मीडियावर ट्रोल करत आहेत, असा आरोप केला आहे. यासंदर्भात त्यांनी राहुल गांधींना खुले पत्र लिहिले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शर्मिष्ठा मुखर्जी यांनी काँग्रेसच्या एका जवळच्या सहकाऱ्यावर ऑनलाईन लैंगिक छळाचा आरोप केला आहे. या प्रकरणी शर्मिष्ठा मुखर्जी यांनी काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्याकडे न्यायाची मागणी केली. इतकंच नव्हे तर 9 फेब्रुवारीला शर्मिष्ठा मुखर्जी यांनी पोलिसांत याप्रकरणी तक्रार केली.


शर्मिष्ठा मुखर्जी यांना त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये ट्रोल करण्यात आले आहे. शर्मिष्ठा यांनी ट्रोल केलेले स्क्रिनशॉर्टदेखील पोस्ट केले आहेत. शर्मिष्ठा मुखर्जी यांनी पोस्ट केलेल्या पोस्टमध्ये ट्रोलरने माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याबद्दल आक्षेपार्ह गोष्टी लिहिल्या होत्या. शर्मिष्ठा यांनी म्हटलं की, @Naveen_Kr_Shahi या नावाच्या युजरला आणि वरिष्ठ नेते मंडळ व काँग्रेसच्या सोशल मीडिया टीमचे अनेक सदस्य फॉलो करतात.


"राहुल गांधी नेहमीच न्यायाबद्दल बोलत असतात. पण त्यांच्या एका खास माणसांमुळे माझ्या आणि माझ्या वडिलांच्या चारित्र्यावर प्रश्न निर्माण केले जात आहेत. मी त्यांच्याकडे न्यायाची मागणी करते. जरी ही व्यक्ती (ट्रोलर) काँग्रेसचा सामान्य समर्थक असल्याचा दावा करत असला तरी राहुल गांधींनी त्यांच्याविरुद्ध पोलिस तक्रार करावी अशी माझी मागणी आहे. कारण त्याने तुमच्या नावाने हे सगळं केलं आहे," असे शर्मिष्ठा मुखर्जी यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.



शर्मिष्ठा मुखर्जी यांनी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहून न्यायाची मागणी केली आहे. महिन्याभरापूर्वी शर्मिष्ठा मुखर्जी यांनी वडिलांवर लिहिलेलं 'प्रणव माय फादर: अ डॉटर रिमेम्बर्स' हे पुस्तक प्रकाशित केलं होतं. जेव्हापासून हे पुस्तक प्रकाशित झाले तेव्हापासून मला अशा प्रकारच्या टीकांना व ट्रोलर्सचा सामना करावा लागत आहे, असेही शर्मिष्ठा मुखर्जी म्हणाल्या.


दरम्यान,  शर्मिष्ठा मुखर्जी यांनी गुरुग्राम पोलिसांच्या सायबर क्राईम युनिटकडे तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी शर्मिष्ठा मुखर्जी यांना आवश्यक ती मदत केली जाईल असं एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने म्हटलं आहे.