नवी दिल्ली : दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या शीला दीक्षित यांचं निधन झाल्याचं वृत्त नुकतंच हाती येतंय. दीर्घकाळापासून त्या आजारी होत्या. प्रकृती अस्वस्थतेच्या कारणामुळे आज सकाळीच त्यांना दिल्लीच्या एस्कॉर्ट रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचार सुरू असतानाच शनिवारी दुपारी त्यांची प्राणज्योत मावळली. मृत्यूसमयी त्या ८१ वर्षांच्या होत्या. त्यांचं पार्थिव शरीर त्यांच्या निजामुद्दीन स्थित निवासस्थानावर आणण्यात आलंय. रविवारी त्यांचं पार्थि काँग्रेसच्या मुख्यालयात ठेवण्यात येईल. त्यानंतर उद्याच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रुग्णालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, शीला दीक्षित यांना हृदयविकाराचा धक्का बसल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परिस्थिती सुधारतेय असं वाटत असतानाच त्यांना पुन्हा एकदा हृदयविकाराचा झटका बसला आणि दुपारी ३.५५ मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 



लोकसभा निवडणूक २०१९ मध्ये दिल्लीच्या उत्तर पूर्व मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली. परंतु, अभिनेते आणि भाजप नेते मनोज तिवारी यांनी त्यांचा पराभव केला. 


 


पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी, माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासहीत अनेक सर्वपक्षीय नेत्यांनी शीला दीक्षित यांना सोशल मीडियावरून आदरांजली व्यक्त केलीय.






शिक्षण आणि राजकीय कारकीर्द


शीला दीक्षित यांचा जन्म ३१ मार्च १९३८ रोजी पंजाबच्या कपूरथलामध्ये झाला होता. त्यांनी दिल्लीच्या कॉन्वेन्ट ऑफ जीजस एन्ड मेरी स्कूलमधून आपलं शालेय शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर दिल्ली युनिव्हर्सिटीच्या मिरांडा हाऊस कॉलेजमधून त्यांनी 'मास्टर्स ऑफ आर्टस' पदवी संपादन केली. 


शीला दीक्षित यांनी १९८४ ते १९८९ पर्यंत त्या उत्तर प्रदेशच्या कन्नौज खासदार राहिल्या. लोकसभेच्या 'एस्टिमेटस कमिटी'मध्येही त्यांचा सहभाग होता. याच दरम्यान त्या संयुक्त राष्ट्रात महिला आयोगात भारताच्या प्रतिनिधी राहण्यासोबतच लोकसभेच्या इतर समित्यांमध्येही सहभागी होत्या. 


राजीव गांधी सरकारमध्ये त्यांनी केंद्रीय मंत्रीपदही भूषवलं. दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदावरून पायउतार झाल्यानंतर २०१४ मध्ये त्यांनी केरळच्या राज्यपालपदही सांभाळलं.


शीला दीक्षित यांचा विवाह उत्तर प्रदेशच्या उन्नावमधील आयएएस अधिकारी दिवंगत विनोद दीक्षित यांच्यासोबत झाला होता. विनोद दीक्षित हे बंगालचे माजी राज्यपाल आणि काँग्रेसचे नेते दिवंगत उमाशंकर दीक्षित यांचे पुत्र होते. शीला दीक्षित यांचा मुलगा संदीप दीक्षित हेदेखील खासदार आहेत.