EXCLUSIVE:संपूर्ण देश सरकारवर नाराज, २०१९मध्ये जनतेकडून वेगळा विचार: यशवंत सिन्हा
यशवंत सिन्हा हे एकेकाळी भाजपचे नेते होते. काही काळापूर्वीच ते भाजपमधून बाहेर पडले. भाजपमध्ये असतानाही आणि भाजपमधून बाहेर पडल्यावरही ते मोदींच्या धोरणांवर टीका करत आले आहेत.
नवी दिल्ली: विद्यमान सरकारवर देशातील शेतकरी प्रचंड नाराज आहे. मोदी सरकारच्या धोरणाचा शेतकऱ्यांना फायदा मिळाला नाही. सरकारने पीकविम्याच्या नावाखाली शेतकऱ्यांकडून पैसा घेतला. पण, प्रत्यक्षात मात्र त्यातील अत्यल्प मोबदला शेतकऱ्याला दिला. सरकारच्या या धोरणामुळे देशातील शेतकरी वर्ग उदासीन आहे. हा शेतकरी येत्या निवडणुकीत धर्म, जात, या मुद्द्यांना फाटा देत वेगळा विचार करेन, अशी भावना माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांनी झी मीडियाकडे व्यक्त केली आहे. यशवंत सिन्हा हे एकेकाळी भाजपचे नेते होते. काही काळापूर्वीच ते भाजपमधून बाहेर पडले. भाजपमध्ये असतानाही आणि भाजपमधून बाहेर पडल्यावरही ते मोदींच्या धोरणांवर टीका करत आले आहेत.
....म्हणून भाजपला सोडचिठ्ठी
गेल्या काही काळापासून देशात होत असलेल्या अनपेक्षीत बदलांमुळे मी नाराज होतो. त्यातही खास करून २०१४ पासून व्यवस्था चुकीच्या मार्गावर निघाल्याचे जाणवत होते. त्यासाठी मी पक्षात राहून अनेकदा माझी नाराजी बोलून दाखवली. मी अनेक वृत्तवाहिन्यांना मुलाखती दिल्या. अनेक लेख लिहिले. पक्षातही ही बाब बोलून दाखवली. पण, धोरणांमध्ये काहीही फरक जाणवला नाही. त्यामुळे मी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. पक्षीय राजकारणात अडकल्यामुळे सामाजिक कार्याला मर्यादा येतात. त्यामुळे मी पहिल्यांदा लोकसभा निवडणूक न लडविण्याचा निर्णय घेतला. आणि आता पक्षातून बाहेर पडलो. आता मी मला हवे ते बोलू शकतो लिहू शकतो, अशीही भावना माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांनी व्यक्त केली.
नोटंबदीचा फटका असंघटीत क्षेत्राला
नोटबंदीच्या मुदद्यावरही यशवंत सिन्हा यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. नोटबंदीच्या निर्णयामुळे देशातील असंघटीत क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. खास करून छोटे छोटे व्यावसाईक, कामगार आदी क्षेत्राला मोठा फटका बसला. नोटबंदीनंतर सरकार दाखवत असलेल्या विकास दराच्या आकड्यांमध्ये मेळ नाही. महत्त्वाचे म्हणजे सरकारने जीडीपी मोजण्याचे सूत्र बदलले. त्यामुळे जीडीपी २ टक्क्यांनी वाढल्याचे पहायला मिळाले. याचाही विचार व्हायला हवा. त्यात जीडीपी मोजताना ज्या आकडेवारीचा आधार घेतला जातो ती आकडेवारी एकमेकांशी मेळ खात नाही.
शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावीच पण....
शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळायला हवीच. पण, केवळ कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांसमोरील समस्या सुटणार नाहीत. कारण या समस्या प्रचंड गुंतागुंतीच्या आहेत. त्यामुळे त्यावर विशेष लक्ष्य देऊन काम करावे लागेल. मात्र, कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांना अल्पकाळासाठी दिलासा मिळेल. सरकारने पीकविम्यासाठी शेतकऱ्यांकडून जेवढा पैसा घेतला त्याचा कितीतरी कमी हिस्सा परतावा म्हणून दिला. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे.