स्कूल, अनाथालयातील अल्पवयीन मुलींवरही राम रहीमचा बलात्कार
डेरा सच्चा सौदाचा प्रमुख बाबा गुरमीत राम रहीम याच्या भक्ताने आणखी एक गौप्यस्फोट करून खळबळ उडवून दिली आहे. राम रहीम हा स्कूल आणि अनाथालयातील मुलींवरही बलात्कार करायचा. तसेच, यातून गरोदर राहिलेल्या मुलींचा डेऱ्यातील हॉस्पीटलमध्ये गर्भपातही करत असे, असा दावा या भक्ताने केला आहे.
नवी दिल्ली : डेरा सच्चा सौदाचा प्रमुख बाबा गुरमीत राम रहीम याच्या भक्ताने आणखी एक गौप्यस्फोट करून खळबळ उडवून दिली आहे. राम रहीम हा स्कूल आणि अनाथालयातील मुलींवरही बलात्कार करायचा. तसेच, यातून गरोदर राहिलेल्या मुलींचा डेऱ्यातील हॉस्पीटलमध्ये गर्भपातही करत असे, असा दावा या भक्ताने केला आहे.
बाबा राम रहीमच्या कृत्याबद्दल न्यायालयाने त्याला २० वर्षांची शिक्षा ठोठावली. बाबा तर तुरूंगात गेला. पण, म्हणून काही त्याची प्रकरणे संपली असे नाही. तो तुरूंगात गेल्यावर दररोज त्याच्या कृत्यांची नवी प्रकरणे बाहेर येतच आहेत. नुकताच त्याच्या एका भक्ताने त्याच्या आणखी एका कृत्याचा भांडाफोड केला आहे. गुरूदास सिंह असे या भक्ताचे नाव असून, तो बाबाचा आणि डेऱ्याचा माजी समर्थक म्हणून ओळखला जातो.
डेऱ्याचा माजी सदस्य गुरूदास सिंह याच्या हवाल्याने इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, स्कूल आणि अनाथालयातील मुलींवरही राम रहीम बलात्कार करत असे. डेरा स्कुलमध्ये शिक्षण घेत असताना बाबा राम रहीमच्या अत्याचाराला बळी पडलेल्या पण, आता वैवाहीक आयुष्य जगत असलेल्या १० महिलांच्या आपण संपर्कात आहोत. या मुलींचे शोषण झाले तेव्हा त्या इयत्ता पाचवीत शिकत होत्या. त्यावेळी ही गोष्ट मी माझ्या परिचीतांना सांगितली. पण, तेव्हा कोणीही माझ्यावर विश्वास ठेवला नाही, असा दावाही गुरूदास सिंह याने केला आहे.
आपण डेऱ्याचा सदस्य होतो तेव्हा माझ्या डोळ्यासमोर तीन मुलींचा गर्भपात केल्याचा दावा केला आहे. तसेच, बाबा राम रहीम याच्याविरोधात आपण बालयौन शोषणाविरूद्ध खटला दाखल करणार असल्याचेही म्हटले आहे.