पणजी: राजकीय लाभ मिळवण्यासाठी माझ्या वडिलांच्या नावाने राफेल करारासंदर्भात खोटी माहिती पसरवू नका, अशी विनंती गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे पूत्र उत्पल पर्रिकर यांनी शरद पवारांना केली आहे. राफेल विमान खरेदी कराराशी सहमत नसल्यानेच तत्कालीन संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता, असे शरद पवार यांनी म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्याला प्रत्युत्तर देण्यासाठी उत्पल पर्रिकर यांनी एक पत्र लिहले आहे. या पत्रात उत्पल यांनी म्हटले आहे की, माझ्या वडिलांच्या नावाने खोटी माहिती पसरवून राजकीय फायदा उठवण्याचा प्रयत्न करू नका. तुमचे विधान असंवेदनशील असून तुम्ही असे वागू नये, असे उत्पल यांनी पत्रात म्हटले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज मनोहर पर्रिकर आपल्यात नाहीत. कदाचित म्हणूनच तुम्ही त्यांच्या नावानं खोटं बोलत आहात आणि राजकीय परीघातला हा नीचांक आहे. एक ज्येष्ठ व आदरणीय राजकारणी असलेल्या तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती पवारसाहेब, अशी खंतही उत्पल यांनी पत्रातून व्यक्त केलेय.



गोव्यातील लोकांच्या प्रेमाखातरच ते गोव्यात परतले. ते लोकनेते असल्यामुळे त्यांनी गोव्यात येऊन शेवटच्या श्वासापर्यंत लोकांच्या हिताचे काम केले. मात्र, राफेल करार मंजूर नव्हता म्हणून ते गोव्यात परतले असे म्हणणे हा पर्रिकर आणि गोव्यातील जनतेचा अवमान आहे. माजी संरक्षण मंत्री म्हणून या सर्व गोष्टींचे महत्त्व तुम्ही जाणून असाल अशी आशा करतो, असेही उत्पल यांनी पत्रात नमूद केले आहे.