मध्य प्रदेश : मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते यांनी भाजपाला घरचा आहेर दिला आहे. पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांना बाजूला केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मध्य प्रदेश निवडणूकीत जे नेते जिंकू शकतील त्यांना बाजूला केल्याचे त्यांचे म्हणणे आहे. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी आपली भेट घेऊन भोपाळमधून कॉंग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याची ऑफर दिल्याचेही बाबूलाल यांनी सांगितले होते. दिग्विजय सिंह यांच्या ऑफरवर काय निर्णय घेतलात ? असे विचारल्यावर मी अजून याबद्दल विचार केला नसल्याचे त्यांनी सांगितले.  भाजपामध्ये ज्येष्ठ नेत्यांना बाजूला ठेवलं जातंय. पण वेळीच पार्टीने याची गंभीर दखल घेतली नाही तर भविष्य चांगले नसेल असे सूचक विधानही त्यांनी केले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

असे सर्व असले तरीही आपण पक्षाशी नाराज नसल्याचे त्यांनी सांगितले. माझी सुन कृष्णा गौर ही गोविंदपुरा विधानसभेतून भाजपच्या तिकिटावर लढत असून ती सध्या भाजपची आमदार असल्याचेही त्यांनी सांगितले. 



बाबूलाल गौर यांच्या वक्तव्यानंतर भाजपकडूनही यावर प्रतिक्रिया आली आहे. कॉंग्रेसमध्ये नेत्यांची कमी असल्याने ते दुसऱ्या पक्षातील नेत्यांना प्रस्ताव देत असल्याचे भाजपतर्फे सांगण्यात आले. गौर हे पार्टीच्या विचारधारेशी जोडले गेलेले नेते आहेत. दिग्विजय यांनी काय समजून त्यांना प्रस्ताव दिला हे मला माहिती नाही. त्यांना स्वत:लाच कॉंग्रेसने महासचिव पदावरून हटवले असल्याचे भाजपा प्रवक्ता राहुल कोठारी यांनी सांगितले. 


गौर आणि दिग्विजय सिंह यांच्यात वैयक्तिक पातळीवर काही चर्चा झाली असेल पण प्रदेश कॉंग्रेसला याबद्दल काही माहिती नसल्याचे कॉंग्रेस प्रवक्ता नरेंद्र सलूजा यांनी सांगितले.