मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने ( Supreme Court) मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) यांना जोरदार धक्का दिला आहे. महाराष्ट्र पोलिसांवर तुमचा विश्वास नाही हे धक्कादायक आहे, असे मत व्यक्त करत सर्वोच्च न्यायालयाने परमबीर सिंह यांची याचिका फेटाळली आहे. त्याचवेळी परमबीर सिंह यांना चांगलेच खडसावले. ज्या पोलीस खात्यात त्यांनी 30 वर्षे सेवा केली त्याच खात्यावर त्यांचा विश्वास नाही हे धक्कादायक आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे. (Former Mumbai Police Commissioner Parambir Singh has been slammed by the Supreme Court) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परमबीर सिंह यांनी चौकशी महाराष्ट्र राज्याबाहेरील स्वतंत्र यंत्रणेमार्फत करण्याची मागणी करणारी याचिका न्यायालयात केली आहे. आपण काचेच्या घरात राहात असू तर इतरांच्या घरांवर दगड फेकू नयेत, असे न्यायालयाने या सुनावणीत म्हटले. याचिका आम्ही फेटाळण्याची ऑर्डर पास करू असे न्यायालयाने म्हटल्यावर सिंह यांच्यावतीने वकिलांनी याचिका मागे घेण्याची तयारी दर्शवली.


दरम्यान, मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशांचे चौकशीदरम्यान उल्लंघन झाले आहे, असेही याचिकेत म्हटले होते. शुक्रवारी याचिकेच्या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने परमबीर सिंह यांना चांगलेच सुनावले. महाराष्ट्रातील पोलिसांच्या चौकशीवर विश्वास नाही ही आश्चर्यकारक गोष्ट आहे. दाखल असलेल्या सगळ्याच गुन्ह्याविषयी आम्ही निर्णय घेऊ शकत नाही. त्यासाठी स्वतंत्र न्यायालये आहेत. आम्ही तुमची याचिका फेटाळत आहोत. तुम्हाला मुंबई उच्च न्यायालयात जायचे आहे तिथे तुम्ही जाऊ शकता, अशा शब्दात सर्वोच्च न्यायालयाने त्यांना फटाकारले.



परमबीर सिंह यांना न्यायालयाने दणका दिल्याने महाराष्ट्र सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी त्यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनंतर त्यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप केले आहेत.