मुंबई : देशाचं पंतप्रधानपद भूषवणाऱ्या माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी त्यांच्या कारकिर्दीवर होणारे आरोप आणि माध्यमांशी एक पंतप्रधान म्हणून असणारं त्यांचं नातं, याविषयी लक्षवेधी वक्तव्य केलं आहे. मंगळवारी एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'चेंजिंग इंडिया' या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात त्यांनी रिजर्व्ह बँक आणि सरकारमध्ये असणारं नातंही स्पष्ट केलं. रिजर्व्ह  बँकेचं स्वातंत्र्य आणि स्वायत्तता यांचा आदर केला गेला पाहिजे, असं म्हणत सरकारसोबत या संस्थेचं असणारं नातं हे एका पती- पत्नीच्या नात्याप्रमाणे आहे, ही बाब त्यांनी अधोरेखित केली. 


देशाच्या पंतप्रधानपदी असताना मनमोहन सिंग यांच्या मवाळ भूमिकांवर अनेकांनीच टीका केली होती. अनेक गोष्टींवर त्यांचं मौन हे काही वादग्रस्त चर्चांना वावही देऊन गेलं. त्याचविषयी त्यांनी या कार्यक्रमात काही मुद्दे स्पष्ट केले. 'मी बऱ्याचदा मौन बाळगल्यामुळे मौन बाळगणारे पंतप्रधान म्हणूनच लोक माझा उल्लेख करायचे. पण, हे पुस्तकच त्याच्यासाठी एक उत्तर आहे. मला इछथे एक बाब स्पष्ट करायला आवडेल, की मी एक असा पंतप्रधान होतो ज्याला माध्यमांशी संवाद साधण्यात कधीच संकोचलेपणा वाटला नाही. माध्यमांची मी नेहमीचट भेट घ्यायचो. किंबहुना विदेशी दौऱ्यावर असताना विमानात किंवा तिथून परत आल्यानंतर मी लगेचच माध्यमांच्या प्रतिनिधींची भेट घ्यायचो', असं ते म्हणाले.   


'चेंजिंग इंडिया' या पुस्तकात मनमोहन सिंग यांचं माध्यमांशी असणारं नातं नेमकं कसं होतं, यावर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. त्याशिवाय अर्थतज्ज्ञ, विकास योजनांची आखणी करणारी व्यक्ती, पंतप्रधान अशा विविध भूमिकांमध्ये मनमोहन सिंग यांचा प्रवास कसा होता, यावर भाष्य करण्यात आलं आहे.