`कंगनाला बलात्काराचा फार अनुभव, तिलाच...`, शिरोमणी अकाली दलच्या प्रमुखांनी अभिनेत्रीला दिलं उत्तर
बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजपा खासदार कंगना रणौतने (Kangana Ranaut) एका मुलाखतीत दावा केला की, जर भारताचं नेतृत्व भक्कम नसतं तर शेतकरी आंदोलनादरम्यान देशात बांगलादेशसारखी स्थिती निर्माण झाली असती.
बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजपा खासदार कंगना रणौतने (Kangana Ranaut) एका मुलाखतीत शेतकरी आंदोलनावर बोलताना केलेल्या विधानांवरुन वाद रंगला आहे. शेतकरी आंदोलनादरम्यान महिलांवर बलात्कार झाले होते असा दावा कंगनाने केला होता. यानंतर भाजपानेही या विधानाचा पक्षाशी काही संबंध नसल्याचं म्हटलं होतं. जर भारताचं नेतृत्व भक्कम नसतं तर शेतकरी आंदोलनादरम्यान देशात बांगलादेशसारखी स्थिती निर्माण झाली असती असं कंगनाने म्हटलं होतं. दरम्यान कंगनाच्या विधानावर व्यक्त होताना पंजाबच्या माजी खासदाराने वादग्रस्त विधान केलं आहे.
कंगनाला बलात्काराचा फार अनुभव आहे असं पंजाबचे माजी खासदार आणि शिरोमणी अकाली दलचे (अमृतसर) प्रमुख सिमरनजित सिंग मान म्हणाले आहेत. "तुम्ही तिला (कंगना रणौत) बलात्कार कसे होतात हे विचारु शकता. म्हणजे लोक बलात्कार कसे होतात हे सांगू शकतात. तिला बलात्काराचा फार अनुभव आहे," असं ते म्हणाल्याचं वृत्त इंडिया टुडेने दिलं आहे. त्यांच्या या विधानाची खातरजमा झालेली नाही.
कंगना रणौतन आपल्या मुलाखतीत आरोप करताना म्हटलं होतं की, शेतकरी आंदोलनादरम्यान मोठा हिंसाचार झाला. त्याठिकाणी बलात्कार झाले आहेत, अनेकांच्या हत्यादेखील झाल्या आहेत. केंद्र सरकारने कृषी संबंधित तीन विधेयक माघारी घेतले नसते तर देशात आणखी काही भयंकर घटना घडल्या असत्या.
"आपल्या देशाचे सर्वोच्च नेतृत्व मजबूत नसते, तर या लोकांनी पंजाबला बांगलादेश बनवले असते. शेतकरी आंदोलनाच्या नावाखाली जे काही चालू होते, ते संपूर्ण देश पाहत होता. निषेधाच्या नावाखाली हिंसाचार कसा पसरवला गेला. आंदोलनादरम्यान अनेक माणसे मारली गेली, मृतदेहांना लटकवले गेले, बलात्कार झाले. सरकारने कृषी विधेयक मागे घेताच या साऱ्यांना धक्का बसला. त्यांची प्लॅनिंग खुप मोठी होती. त्यांच्यावर सरकारने वेळीच नियंत्रण मिळवले, अन्यथा ते काहीही करू शकले असते, असे कंगनाने म्हटलं होतं.
भाजपा नेतृत्वाने आपल्याला या विधानाबद्दल फटकारलं आहे अशी माहिती कंगनाने दिली आहे. "मी संघाचा अंतिम आवाज नाही. असं वाटण्याइतका मी काही वेडा नाही," असंही ती म्हणाली. कंगना रणौत राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री आहे. हिमाचल प्रदेशच्या मंडीमधून निवडणूक जिंकत ती खासदार झाली आहे.