सुषमा स्वराज यांच्यावर दुपारी ३ वाजता होणार अंत्यसंस्कार
`स्वराज`पर्वाचा अंत!
मुंबई : भारताच्या माजी परराष्ट्र मंत्री आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांचं मंगळवारी रात्री निधन झालं. हृदयविकाराच्या तीव्र झ़टक्यामुळे त्यांचं निधन झालं. त्या ६७ वर्षांच्या होत्या. स्वराज यांच्या निधनाचं वृत्त कळताच देशभरातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. बुधवारी दुपारी ३ वाजता त्यांच्यावर लोधी रोड येथे असणाऱ्या स्मशानभूमीत त्यांच्यावर संपूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. भाजपच्या कार्यकारी अध्यक्षपदी असणाऱ्या जगत प्रकाश नड्डा यांनी याविषयीची माहिती दिली.
एम्स रुग्णालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार ९ वाजण्याच्या सुमारास प्रकृती अस्वास्थ्यामुळे स्वराज यांना रात्री साडेनऊ वाजेपर्यंत एम्समध्ये आणण्यात आलं. जवळपास ७० ते ८० मिनिटांपर्यंत डॉ़क्टरांच्या चमूने त्यांच्यावर उपचार केले, पण त्यांचे हे प्रयत्न अपयशी ठरले. रात्री १० वाजून ५० मिनिटांच्या सुमारास त्यांना मृत घोषित करण्यात आलं.
स्वराज यांच्या निधनामुळे सारा देश दु:खात असल्याची प्रतिक्रिया नड्डा यांनी दिली. सध्याच्या घडीला स्वराज यांचं पार्थिव त्यांच्या राहत्या घरी ठेवण्यात आलं आहे. बुधवारी सकाळी ११ ते १२ वाजण्यच्या सुमारास त्यांचं पार्थिव भाजप मुख्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. तर, दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास त्यांच्यावर पूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहितीसुद्धा नड्डा यांनी दिली.
स्वराज या गेल्या काही महिन्यांपासून आजारी होत्या. त्यामुळेच त्यांनी लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला होता. शिवाय मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात त्यांनी मंत्रिपद घेण्यासही नकार दिला होता. असं असलं तरीही त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या पहिल्या कार्यकाळात गाजवलेली कारकिर्द देशवासियांची विशेष दाद मिळवून गेली.