नवी दिल्ली : माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांना विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांच्याविषयी केलेलं ट्विट चांगलंच भोवलं आहे. अभिनंदन यांच्या मायदेशी परण्यानंतर त्यांना शुभेच्छा देणारं ट्विट खुर्शीद यांनी केलं तरं, पण त्यातही त्यांनी लिहिलेल्या ओळी पाहता या ट्विच्या माध्यमातूनही ते श्रेयवादाचा मुद्दा अधोरेखित करत असल्याचं प्रतित झालं. ज्यामुळे त्यांच्यावर अनेकांचाच रोष ओढावला. सरतेशेवटी आपण श्रेय लाटण्यासाठी हे ट्विट केलं नसल्याचं म्हणत त्यांनी या प्रकरणी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'मी असं नाही म्हणालो, की हे सर्व प्रकरण काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात झालं. ज्या व्यक्तीने या हल्ल्याचा सामना केला तो व्यक्ती काँग्रेस सरकारच्याच कार्यकाळात वायुदलाच्या सेवेत रुजू झाला होता. त्यामुळे मी फक्त जे सत्य आहे तेच मांडण्याचा प्रयत्न करत आहे. मी काही श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत नाही', असं खुर्शीद म्हणाल्याचं वृत्त टाईम्स नाऊने प्रसिद्ध केलं. 


हे होतं खुर्शीद यांचं ट्विट


भारतीय वायुदलात कार्यरत असणाऱ्या विंग कमांडर अभिनंदंन यांची पाकिस्तानकडून सुटका केल्यानंतर सर्व देशाकडून त्यांचं स्वागत करण्यात आलं. खुर्शीदही यात मागे राहिले नाहीत. पण, त्यांचं ट्विट मात्र अनेक वादांना वाचा फोडणारं ठरलं. अभिनंदन यांच्या साहसाची प्रशंसा करत त्यांनी या ट्विटमध्ये थेट ते वायुदलाच्या सेवेत रुजू झाल्याच्या वर्षाचा उल्लेख केला. उतकच नव्हे तर, २००४ या वर्षात युपीएच्याच कार्यकाळात त्यांना हा हुद्दा मिळालाच्याचंही त्यांनी या ट्विटमध्ये मांडलं. अनेकांना त्यांचं हे ट्विट म्हणजे श्रेयवादासाठी मांडलेला मुद्दा असल्याचं भासलं आणि खुर्शीद वादाच्या भोवऱ्यात अडकले. 



कोण आहेत विंग कमांडर अभिनंदन वर्थमान? 


भारतीय वायुदलात विंग कमांडर अभिनंदन हे लढाऊ विमानाचे वैमानिक असून, त्यांनी पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या हवाई हल्ल्याचं चोख उत्तर दिलं होतं. शत्रूचा हल्ला परतवून लावताना त्यांच्या मिग २१ या विमानावरही पाकिस्तानकडून निशाणा साधण्यात आला होता. ज्यामुळे हे विमान अपघातग्रस्त होऊन अभिनंदन हे पाकव्याप्त भागात पडले आणि त्यांना पाकिस्तानी सैन्याने ताब्यात घेतलं होतं. अभिनंदन यांची पाकिस्तानातून सुटका करण्यासाठी केंद्राकडून काही सूत्र वेगाने हलवण्यात आली. परिणामी विंग कमांडर अभिनंदन भारतात आले आणि भारतीयांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.