Kalki Dham : उत्तर प्रदेशातील संबल जिल्ह्यात भगवान विष्णूचा 10वा अवतार असलेल्या कल्कीचे मंदिर बांधले जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज या मंदिराची पायाभरणी करणार आहेत. या मंदिराचे पीठाधीश्वर आचार्य प्रमोद कृष्णम आहेत, ज्यांची नुकतीच पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आली होती. हे मंदिर श्री कल्की धाम निर्माण ट्रस्टद्वारे बांधले जात आहे. अध्यक्ष आचार्य प्रमोद कृष्णम यांनी 1 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान मोदींची भेट घेतली आणि त्यांना मंदिराच्या पायाभरणीसाठी आमंत्रित केले. काही दिवसांनंतर काँग्रेसने आचार्य प्रमोद कृष्णम यांची 'पक्षविरोधी कारवायांमध्ये' सहभाग असल्याचे कारण देऊन त्यांची पक्षातून 6 वर्षांसाठी हकालपट्टी केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पायाभरणीच्या कार्यक्रमाला अनेक संत, धर्मगुरू आणि इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावेळी पंतप्रधान मोदी एका जाहीर सभेलाही संबोधित करणार आहेत. भगवान कल्की हा भगवान विष्णूचा दहावा अवतार मानला जातो. संबलमध्ये बनवल्या जाणाऱ्या श्री कल्की धामला जगातील सर्वात अनोखे मंदिर म्हटले जात आहे. या मंदिरात भगवान विष्णूच्या 10 अवतारांसाठी 10 वेगवेगळी गर्भगृहे असतील. श्री कल्की धाम मंदिर परिसर पाच एकरात पूर्ण होणार असून त्याला पाच वर्षांचा कालावधी लागणार आहे.


मंदिराच्या इमारतीची वैशिष्ट्ये


ज्या गुलाबी रंगाच्या दगडापासून सोमनाथ मंदिर आणि अयोध्येचे राम मंदिर बनवले गेले आहे त्याच रंगाच्या दगडाने हे मंदिर बांधले जात आहे. तसेच या मंदिरात स्टील किंवा लोखंडाचा वापर केला जाणार नाही. मंदिराचे शिखर 108 फूट उंच असेल. मंदिराचा चबुतरा 11 फूट वर बांधला जाणार आहे. येथे 68 तीर्थक्षेत्रे स्थापन करण्यात येणार आहेत. हे मंदिर अंदाजे पाच एकरावर बांधले जाणार असून बांधकामासाठी अंदाजे पाच वर्षे लागतील. हे मंदिर इमारतीच्या दृष्टिकोनातून भव्य असेल आणि धार्मिक दृष्टिकोनातूनही दिव्य असेल.


या बांधकादरम्यान, कल्की पीठ जुन्या जागेवरच राहील. जेव्हा कल्की धाम बांधले जाईल, तेव्हा देवाची नवीन मूर्ती बसवण्यात येणार आहे. शास्त्रात असे लिहिले आहे की जेव्हा भगवान कल्की अवतार घेतील तेव्हा भगवान शिव त्यांना देवदत्त नावाचा पांढरा घोडा देतील. भगवान परशुराम त्याला तलवार देतील आणि भगवान बृहस्पती त्याला शिक्षण देतील. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन देवाची मूर्ती अशाच स्वरुपात तयार करण्यात येणार आहे.


कल्की धामचे पीठाधीश्वर आचार्य प्रमोद कृष्णम यांनी सांगितले की, "18 वर्षांपूर्वी जिथे देव अवतार घेईल, तिथे देवाचे कल्कि धाम बांधले जावे, असा संकल्प केला होता. ते कसे बनवायचे आणि कोणी बनवायचे हे माहीत नव्हते. कोट्यवधी सनातन्यांच्या भावना लक्षात घेऊन कल्की धामची पायाभरणी करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल पंतप्रधानांचे मनःपूर्वक आभार."


"सुमारे 11 हजार संत या पायाभरणीचे साक्षीदार होणार आहेत. हा प्रवास सत्ययुग ते कलियुग आहे आणि विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संपूर्ण अनंत प्रवासात पुलाचे काम केले आहे. प्रभू रामाच्या मंदिराचे काम त्यांनी केले आणि आता ते भगवान कल्की मंदिराचे कामही करायला येत आहेत. कारण राष्ट्र हे राजकारणाच्या वर आहे. राजकारण ही फार छोटी गोष्ट आहे. मी खूप भाग्यवान आहे की मला हे काम करण्याची संधी मिळत आहे. देव स्वतः निवडतो. देवाने मोदीजींना निवडले आणि आम्ही त्यांचे निमित्त झालो," असे आचार्य प्रमोद कृष्णम यांनी सांगितले.


दरम्यान,  भगवान विष्णू कल्किच्या रूपात अवतार का घेतील? असा प्रश्न विचारला जातो. जेव्हा पाप आणि अन्याय खूप वाढतील तेव्हा त्यांचा नाश करण्यासाठी कल्की अवतार घेईल.