श्रीनगर: जम्मू-काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यात शुक्रवारी पहाटे भारतीय लष्कर आणि दहशतवादी आमनेसामने आले. यावेळी झालेल्या जोरदार धुमश्चक्रीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले आहे. मात्र, या चकमकीत पाच भारतीय जवानही जखमी झाले आहेत. त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. प्राथमिक माहितीनुसार, बडगाम जिल्ह्यातील सुत्सू गावात दहशतवादी लपून बसल्याची माहिती लष्कराला मिळाली. या माहितीच्याआधारे लष्कराने हा संपूर्ण परिसर रिकामा करून शोध मोहीमेला सुरुवात केली. त्यावेळी दहशतवाद्यांना भारतीय जवानांच्या दिशेने गोळीबार केला. या गोळीबाराला लष्कराकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आले. या परिसरात आणखी दहशतवादी लपून बसले आहेत का, यासाठी लष्कराकडून सध्या शोध मोहीम सुरु आहे. 




पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाक सीमारेषेवरील तणाव कमालीचा वाढला आहे. गेल्या काही दिवसांत अनेकदा लष्कर आणि दहशतवादी आमनेसामने आल्याचे प्रकार अनेकदा घडले आहेत. गुरुवारी शोपियान जिल्ह्यातील केल्लर येथे भारतीय जवानांनी तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते. भारतीय सैन्यदल, सीआरपीएफ आणि जम्मू- काश्मीर पोलीस यांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली होती.