बाईकवर प्रवास करताना अनेकदा मागच्या सीटवर बसलेल्या तरुणी किंवा महिलांचा दुपट्टा, साडी किंवा स्कार्फ मागच्या चाकापर्यंत आलेले असतात. जर हा दुपट्टा किंवा साडी चाकात अडकली तर मोठी दुर्घटना होण्याची शक्यता असते. पण या जीवघेण्या धोक्याकडे सर्रासपणे दुर्लक्ष केलं जातं. दरम्यान, आई-वडिलांच्या अशाच चुकीमुळे एका 4 वर्षाच्या चिमुरडीला आपला हात गमवावा लागला आहे. स्कार्फ चाकात आल्याने स्कार्फसह मुलीचा हातही चाकात जाऊन अडकला आणि खांद्यापासून वेगळा झाला. यानंतर मुलीने रस्त्यात एकच टाहो फोडला होता. मध्य प्रदेशात ही घटना घडली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खरगोनच्या चित्तोडगढ-भुसावळ राज्य महामार्गावर ही घटना घडली. येथे 4 वर्षाच्या मुलीचा हात खांद्यापासून वेगळा झाला. मुलीचं रडणं ऐकून तेथून जाणारे नागरिकही हतबल झाले होते. अखेर मुलीला तिच्या तुटलेल्या हातासह इंदोरच्या रुग्णालयात नेण्यात आलं. 


मुलीचे वडील राकेश सोलंकी हे खासगी कंपनीत कामाला आहेत. राकेश सोलंकी आपली पत्नी सलिता आणि मुलगी अंशिका उर्फ डोलू यांच्यासह भगवानपुरा येथून खरगोनला निघाले होते. सलिता सोलंकी मागील सीटवर बसल्या होत्या. ऊन लागत असल्याने त्यांनी मुलीला स्कार्फने झाकलं होतं. याचवेळी रस्त्यात अचानक स्कार्फ मागच्या चाकात जाऊन अडकतो. यादरम्यान काही कळण्याच्या आधीच मुलीचा हातही मागच्या चाकात जाऊन अडकतो आणि खांद्यापासून वेगळा होतो. 


राकेश सोलंकी यांनी बाईक थांबवली तेव्हा मुलगी रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. दरम्यान, अपघात झाल्याने लोकांचीही गर्दी झाली होती. यातील एका व्यक्तीने दुचाकीत अडकलेला मुलीचा हात बाहेर काढला. यावेळी उपस्थितांनाही अपघात पाहून धक्का बसला होता. राकेश सोलंकी आणि सलिता यांना तर काही सुचतच नव्हतं. दरम्यान, उपस्थितांनी एक रिक्षा थांबवत त्यांना रुग्णालयात पाठवलं. यावेळी तुटलेला हात पिशवीतून नेण्यात आला. 


5 तासांच्या सर्जरीनंतर जोडला हात


अंशिकाचा हात वेगळा झाल्यानंतर नातेवाईक तिला खरगोन येथील खासगी रुग्णालयात घेऊन गेले होते. तिथे डॉक्टर निशांत महाजन यांनी आधी अंशिकाचा रक्तस्त्राव रोखण्यासाठी प्राथमिक उपचार केले. यानंतर तिला इंदोरला पाठवण्यात आलं. इंदोरच्या खासगी रुग्णालयात तिच्यावर 5 तास सर्जरी करत अखेर हात जोडण्यात आला. डॉक्टरांचं म्हणणं आहे की, जर शरिराचा एखादा भाग तुटला असेल तर तो पुन्हा जोडला जाऊ शकतो. फक्त शरिरातील रक्ताभिसरण प्रक्रिया सुरु असायला हवी.