नवी दिल्ली: मंदीच्या फेऱ्यापासून भारतीय अर्थव्यवस्थेचा बचाव करण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी शुक्रवारी महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. यावेळी देशी-विदेशी गुंतवणूकदारांच्या दीर्घ तसेच अल्प मुदतीच्या भांडवली नफ्यावर यंदाच्या अर्थसंकल्पात लागू केलेला वाढीव कर-अधिभार मागे घेत असल्याचेही निर्मला सीतारामन यांनी जाहीर केले. यामुळे शेअर बाजारात पुन्हा एकदा तेजी येण्याची शक्यता आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सरकारच्या या निर्णयामुळे भांडवली बाजारातील गुंतवणुकदारांची तब्बल ४ ते ७ टक्क्यांची बचत होणार आहे. ५ जुलै रोजी सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात या अधिभाराची घोषणा करण्यात आली होती. यानंतर परकीय गुंतवणूकदारांनी भांडवली बाजारातून सहा आठवडय़ांत तब्बल २३,००० कोटी रुपयांहून गुंतवणूक काढून घेतली होते. परिणामी अर्थसंकल्पानंतर सेन्सेक्स ३००० अंकांनी कोसळला. तत्पूर्वी सेन्सेक्सने ४० हजारांची सर्वोच्च पातळी गाठली होती. मात्र, सरकारच्या अधिभार लावण्याच्या निर्णयानंतर परकीय गुंतवणूकदारांनी भांडवली बाजारातून काढता पाय घेतला होता.


मात्र, आता अधिभार रद्द झाल्याने विदेशी गुंतवणूकदारांचा विश्वास आता परत मिळविता येऊ शकेल. जेणेकरून शेअर बाजारात पुन्हा तेजी पाहायला मिळेल. 


याशिवाय दोन कोटीपेक्षा जास्त उत्पन्नावर २५ टक्के तर ५ कोटीपेक्षा जास्त उत्पन्नावरही सरकारने अनुक्रमे २५ आणि ३९ टक्के इतका अधिभार लावला होता. मात्र, सरकारकडून हा निर्णयही मागे घेण्यात आला. यामुळे शेअर बाजारातील उत्साह परतणार आहे. 


याशिवाय, केंद्र सरकारने घर आणि वाहन खरेदीदारांना स्वस्त कर्जाची सोय करून या उद्योगांना चालना देणे, अशा अनेक उपायांची घोषणा केली आहे. याचेही सकारात्मक पडसाद अर्थव्यवस्थेत दिसून येतील.