छत्तीसगड : मोबाईल अॅप 'ट्रू कॉलर'वर विश्वास ठेवणं एका व्यक्तीला भलतंच महागात पडलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रायपूरमध्ये सब इंजिनिअर म्हणून काम करणाऱ्या शिव प्रकाश मिश्रा नावाच्या एका व्यक्तीला बँकेतून फोन केल्याचं सांगत तब्बल ४० हजारांचा गंडा घालण्यात आला. या व्यक्तीनं 'ट्रू कॉलर'ची मदत घेऊनही त्याची फसवणूक झाल्याचं उघड झालंय. 


ट्रू कॉलर या अॅपमध्ये मोबाईल धारकाचं तेच नाव समोर येतं जे या अॅपच्या डाटा बेसमध्ये नोंद झालेलं असतं. काही जण याच डाटा बेसमध्ये खोटी नाव आणि ओळख नोंदवून ग्राहकांची फसवणूक करत आहेत. 


जल संसाधन विभागात काम करणाऱ्या शिव यांना ८९०१०५४१९८ या मोबाईल क्रमांकावरून एक फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीनं आपण एसबीआय कर्मचारी असल्याचं सांगितलं. शिव यांना याबद्दल थोडा संशय वाटला म्हणून ट्रू कॉलरवर त्यांनी हा क्रमांक सर्च केला तर त्यावर एसबीआय नावानं हा क्रमांक दिसला.


त्यामुळे शिव यांनी आपल्या अकाऊंटची गोपनिय माहिती फोनवरच्या व्यक्तीला दिली... थोड्या वेळानं त्यांच्या बँक अकाऊंटवरून ४० हजार रुपये काढण्यात आल्याचा मॅसेज त्यांना मिळाला. 


यानंतर शिव यांनी आपली फसवणूक झाल्याची तक्रार पोलिसांत नोंदवलीय. पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे.