स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव: 15 ऑगस्टपर्यंत या ठिकाणी फ्री एन्ट्री
स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षानिमित्त अनेक ठिकाणी मोफत एन्ट्री असणार आहे.
नवी दिल्ली: भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) स्वातंत्र्याच्या ७५ वर्षाच्या निमित्ताने 'हर घर तिरंगा' मोहिमेचा भाग म्हणून देशभरातील 150 स्मारकांवर राष्ट्रध्वज फडकवणार आहे. सांस्कृतिक मंत्रालयाच्या माहितीनुसार, या स्मारकांवर ध्वजारोहण करण्यासोबतच ते तिरंगा दिव्यांनीही सजवण्यात येणार आहे. देशभरातील 750 स्मारकांमध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार असून 5 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान देशभरातील सर्व केंद्रीय संरक्षित स्मारकांमध्ये मोफत प्रवेशाची घोषणा करण्यात आली आहे.
ASI ची 37 मंडळे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे प्रतीक म्हणून स्थानिक लोकांचा सहभाग असलेले अनेक कार्यक्रम आयोजित करतील. या कार्यक्रमांमध्ये वृक्षारोपण मोहीम, शालेय संवाद, व्याख्याने, वैद्यकीय शिबिरे आणि मुलांचे जागृती कार्यक्रम यांचा समावेश आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या महिन्यात ‘हर घर तिरंगा’ मोहीम सुरू केली. भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त पंतप्रधान मोदींनी लोकांना आपापल्या घरी तिरंगा फडकवण्याचे आवाहन केले होते. लोकांच्या मनात देशभक्तीची भावना जागृत करणे आणि लोकसहभागाच्या भावनेने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करणे हा त्यामागचा हेतू आहे.
सांस्कृतिक मंत्रालयाच्या मते, राज्ये, केंद्रशासित प्रदेश आणि मंत्रालये या मोहिमेत उत्साहाने सहभागी होत आहेत. देशभक्ती आणि देशाची एकात्मता दर्शविण्यासाठी स्वातंत्र्यलढ्याशी संबंधित अनेक ठिकाणी लोकांशी संबंधित कार्यक्रमही आयोजित केले जाणार आहेत.
देशातील सर्व टपाल कार्यालयांनी 1 ऑगस्ट 2022 पासून ध्वजांची विक्री सुरू केली आहे. याशिवाय राज्य सरकारांनी ध्वजांच्या पुरवठा आणि विक्रीसाठी अनेक करारही केले आहेत. ध्वजांच्या पुरवठ्यासाठी सरकारने अनेक ई-कॉमर्स वेबसाइटशीही करार केला आहे.
भारताच्या स्वातंत्र्याची ७५ गौरवशाली वर्षे साजरी करण्यासाठी १२ मार्च २०२१ रोजी पंतप्रधान मोदींनी आझादी का अमृत महोत्सवाचा उपक्रम सुरू केला होता.