`आयटी` नाही तर इकडे मिळतो सर्वाधिक पगार, पुण्याचा नंबर पहिला
जर तुम्ही फ्रेशर(0-६ वर्षांचा अनुभव) असाल तर चांगल्या पगारासाठी मुंबईत नाही तर पुण्यात जा.
मुंबई : जर तुम्ही फ्रेशर(0-६ वर्षांचा अनुभव) असाल तर चांगल्या पगारासाठी मुंबईत नाही तर पुण्यात जा. कारण फ्रेशर्ससाठी पुणे हे सर्वाधिक पगार देणारं शहर बनलं आहे. २०१८ मध्ये पुण्यातलं वर्षाचं सरासरी सर्वाधिक वेतन ७.१ लाख रुपये एवढं आहे. यानंतर मुंबईमध्ये सरासरी सर्वाधिक वेतन ६.५ लाख रुपये आहे. एका सर्व्हेमध्ये ही माहिती समोर आली आहे. आयटी कंपन्यांमध्ये सर्वाधिक पगार मिळतो असं आत्तापर्यंत बोललं जायचं पण आता दुसऱ्या क्षेत्रामध्ये सर्वाधिक पगार मिळत आहे.
फार्मा क्षेत्रामध्ये सर्वाधिक पगार
कंन्सलटन्सी फर्म रँडस्टॅड इंडियानं जवळपास २० उद्योगांच्या १ लाख नोकऱ्यांचा सर्व्हे केला. या सर्व्हेनंतर ही माहिती समोर आली आहे. यामध्ये नोकरदारांच्या वर्षाच्या पगाराची माहिती देण्यात आली आहे. सर्वाधिक पगार देणाऱ्यांमध्ये आता आयटीची मक्तेदारी संपली आहे. फार्मा क्षेत्रामध्ये सध्या सर्वाधिक पगार मिळत आहे. फार्मानंतर सेवा क्षेत्राचा(मॅनेजमेंट कन्सलटिंग, अकाऊंटिंग, ऑडिट आणि लिगल फर्म) नंबर लागतो. जीएसटी लागू झाल्यामुळे हे बदल झाल्याचं बोललं जात आहे. २०१७ साली पहिल्या क्रमांकावर असलेलं एफएमसीजी आता तिसऱ्या क्रमांकावर गेलं आहे. तर आयटी आणि रियल इस्टेट अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहे.
कुशल युवकांना दीड पट जास्त पगार
या रिपोर्टनुसार प्रत्येक उद्योगामध्ये कुशल युवक आहेत. या युवकांना आपल्याच कंपनीमध्ये ठेवण्यासाठी कंपनी गलेलठ्ठ पगार देण्यासाठीही तयार आहेत. यामुळेच कुशल कर्मचाऱ्यांचा पगार दीडपट जास्त वाढला आहे. यामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांना वर्षाला १८.४० लाख रुपये पगार मिळतो. आर्किटेक्टना १५.१ लाख रुपये, प्रोडक्शन इंजिनिअरिंग स्पेशलिस्टला १४.८ लाख रुपये पगार दिला जातो. ६-१२ वर्ष अनुभव असणाऱ्यांना कमी पगार मिळतो. यात पगारवाढीच्या टक्केवारीमध्येही कमतरता दिसून येत आहे.
अनुभवाला बंगळुरूमध्ये सर्वाधिक वेतन
या कंन्सलटन्सी फर्मच्या सर्व्हेनुसार १५ वर्षांपेक्षा जास्त अनुभव असणाऱ्यांना बंगळुरूमध्ये सर्वाधिक पगार मिळतो. बंगळुरूमध्ये अनुभवी कर्मचाऱ्यांना कायम ठेवण्यासाठी २४.५० लाख रुपयांपर्यंतचं पॅकेज दिलं जातं. पुणे याबाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. पुण्यात अनुभवी कर्मचाऱ्यांना २४.१० लाख रुपये पगार वर्षाला मिळतो. मिड लेवल मॅनेजमेंटच्या कर्मचाऱ्यांच्या पगारामध्येही बंगळुरू पहिल्या क्रमांकावर आहे. पुणे दुसऱ्या, मुंबई तिसऱ्या आणि दिल्ली चौथ्या क्रमांकावर आहे.