मुंबई : १ एप्रिलपासून देशभरातील ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांना कोरोना लस घेता येणार आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी तशी घोषणा केली आहे. ४५ वर्षांवरील नागरिकांना लस घेण्यासाठी नोंदणी करावी लागेल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आतापर्यंत कोविड योद्धे, फ्रंटलाईन वर्कर्स, ४५ वर्षांवरील सहव्याधी असणारे रुग्ण आणि ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना कोरोना लस देण्यात येत होती. मात्र आता यात बदल करण्यात आले असून ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांना १ एप्रिलपासून लस घेण्याची परवानगी देण्यात आली आहे. 


भारताकडे मुबलक प्रमाणात लसी आहेत, अशी माहितीही केंद्रीय सूचना आणि माहिती प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे. याशिवाय दोन्ही लस सुरक्षित असल्याचंही जावडेकर म्हणाले आहेत. त्यामुळे मान्यता मिळालेल्या नागरिकांनी लवकरात लवकर नोंदणी करून लस घ्यावी, असं आवाहनही केंद्र सरकारतर्फे करण्यात आला आहे. 


भारतात आतापर्यंत ४ कोटी ८५ लाख नागरिकांना लस देण्यात आल्याची माहितीही जावडेकर यांनी दिली आहे. याचाच वेग वाढवण्यासाठी तसंच लसी मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याने ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांना आता लस देण्याची मुभा देण्यात आली आहे. टास्क फोर्स आणि वैज्ञानिकांचं मत जाणून केंद्रीय मंत्रिमंडळाने हा निर्णय घेतला आहे.