मुंबई :  सर्वसाधारण लग्न तुम्ही पाहिलचं असेल, नवरा घोड्यावरून आणि वऱ्हाडी त्याच्या पुढे नाचत-गात येत असतात. मात्र या घटनेत अनोखीच वरात काढण्यात आली आहे. आलिशान चारचाकीला ब्रेक देत नवरा थेट सायकलीवरून लग्नमंडपात आला. विशेष म्हणजे त्याच्यासोबत जे वरातीत होते ते सुद्धा कुठल्याही चारचाकीने न येता थेट पायीच आले. मुळात अशी वरात काढण्यामागे त्याचा इंधन दरवाढीविरोधात निषेध आंदोलन करण्याचा मानस होता. त्याच्या या आंदोलनाची व अनोख्या वरातीची चर्चा सोशल मीडियावर रंगलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्रात आज पेट्रोलची किंमत १२० रूपये लीटर, तर डिझेलचे दर १०४ रूपयांवर पोहोचलेत. तर मुंबईत घरगुती गॅसच्या किंमती वाढून १००३ रूपये आणि व्यावसायिक गॅसच्या किंमती 2306 रुपयांवर पोहोचल्या आहेत. यामुळे सर्वसामान्यांना उन्हासोबत आता महागाईच्या झळा सोसाव्या लागतायत. 


देशात इंधन दरवाढीचा भडका उडालाय. पेट्रोल-डिझेलपासून घरगूती गॅसच्या किंमतींनी आभाळ गाठलय. त्यामुळे आता घरात गॅस पेटवायचा की नाही ? आणि सर्वसामान्यांची आपली दुचाकी आणि चारचाकी रस्त्यावर उतरवावी की नाही असा प्रश्न पडलाय. 


भुवनेश्‍वरमध्येही अशीच परीस्थिती आहे. इंधन दरापासून सर्व वस्तुंचे दर वाढलेत. या इंधन दरवाढीचा निषेध नोंदवण्यासाठी नवऱ्याने आपल्या लग्नाचीच तारीख ठरवत अनोखे आंदोलन केले.ओडिशाची राजधानी भुवनेश्वरमध्ये हे आंदोलन करण्यात आले. लग्नमंडपात नवरा थेट सायकलनेचं दाखल झाला. वराती सुद्धा नवऱ्यामागे चालत आली. अशाप्रकारे नवऱ्याने अनोखे आंदोलन करत इंधन दरवाढीचा निषेध केला. या वरातीचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत असून या लग्नाची एकचं चर्चा रंगलीय. 


पीटीआय वृत्तसंस्थेला दिलेल्या प्रतिक्रीयेत शुभ्रांशू समल म्हणाला की, देशातील वाढत्या इंधनाच्या किमतींचा निषेध करण्यासाठी मी सायकलने लग्नाच्या मंडपात पोहोचण्याचा निर्णय घेतला. नवऱ्याच्या पेहराव्यात मी सायकलने एक किलोमीटरचे अंतर कापून लग्नस्थळी पोहोचलो. माझ्या या आंदोलनाला कुटुंबीय, मित्रमंडळी इतर सामान्य जनतेचं सहकार्य मिळालं असल्याचे त्याने सांगितले. 


सामल पुढे म्हणाला की, माझ्यासारखे असे असंख्य नागरीक आहेत जे इंधनाच्या वाढत्या किमतींमुळे निराश आहेत. एक सामान्य माणूस म्हणून मी माझी नाराजी व्यक्त करण्यासाठी अशा प्रकारचे आंदोलन केले. 


दरम्यान राजधानी भुवनेश्वरमध्ये 18 मे रोजी अशी वरात काढण्यात आली होती. नवऱ्याला सायकलवरून जाताना पाहून अनेकांनी त्यांच्यासोबत सेल्फीस काढल्या. तसेच नागरीकांना त्यांच्या लग्नमंडपात सायकलवरून येण्याचे कारण कळताच,सोशस मीडियावर याची एकचं चर्चा सुरु झाली.