Dominica मधून मेहुल चोक्सीचा पहिला फोटो समोर, हातावर निशाण
मेहुल चोक्सीचा हा अँटिग्वाचा नागरिक असल्याचा त्याच्या वकिलांनी दावा
मुंबई : पीनएबी घोटाळा प्रकरणातील प्रमुख आरोपी मेहुल चौक्सी (Mehul Choksi)बाबत मोठी बातमी समोर आली आहे. डोमिनिका (Dominica) कारागृहातून आरोपी मेहुल चोक्सीचा पहिला फोटो समोर आला आहे. या फोटोंमध्ये त्याच्या शरीरावर जखमा दिसत आहेत. या प्रकरणात चोक्सीच्या वकीलांनी कारागृहात मारपीट केल्याचा दावा केला आहे.
चोक्सीच्या समोर आलेल्या फोटोत तो खूप आजारी असल्यासारखा दिसत आहे. कैद्यांच्या कपड्यात त्याच्या हाताला शाई लागल्यासारखी त्याचे हात एकदम काळे निळे दिसत आहेत. तसंच डोळेही अगदी लाल दिसत आहेत.
डोमिनिकाच्या गुन्हे अन्वेषण विभागाने मेहुल चोक्सीला पकडले. मेहुल चोक्सी (Mehul Choksi) हा पीएनबी घोटाळ्यातील आरोपी आहे, त्याच्याविरुद्ध इंटरपोलनेही रेड कॉर्नर नोटीस बजावलीय. तो अँटिग्वामधून क्युबा येथे पळून गेल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या.
मेहुल चोक्सीचा हा अँटिग्वाचा नागरिक असल्याचा त्याच्या वकिलांनी दावा केला आहे. तो अँटिग्वाचा नागरिक असल्यानं तिथे मिळणारे सर्व हक्क त्याच्याकडे आहेत. अँटिग्वा एक कॅरिबियन देश आहे. ज्या देशात मेहुल चोक्सीला अटक केली गेली, तो अँटिग्वाच्या आसपासच्या भागातच येतो. परंतु मेहुल चोक्सी डोमिनिकाला का गेला? याचा मात्र अद्याप उलगडा झालेला नाही.
चोक्सी आणि नीरव मोदी यांच्यावर पंजाब नॅशनल बँकेची (PNB) काही बँक अधिकाऱ्यांशी संगनमत करून 13,500 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. नीरव मोदी सध्या लंडनच्या तुरुंगात आहे. सीबीआय या दोघांविरुद्ध चौकशी करत आहे. अंमलबजावणी संचालनालयाने पंजाब नॅशनल बँक घोटाळ्याप्रकरणी मेहुल चोक्सीची 14 कोटींपेक्षा जास्त संपत्ती जप्त केली होती.