भारतीय सैन्य दलाला चीनविरूद्ध कारवाईसाठी पूर्ण स्वातंत्र्य - सूत्र
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी सीडीएस जनरल बिपिन रावत आणि तिन्ही सेना प्रमुखांशी उच्चस्तरीय बैठक घेतली.
नवी दिल्ली : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी सीडीएस जनरल बिपिन रावत आणि तिन्ही सेना प्रमुखांशी उच्चस्तरीय बैठक घेतली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संरक्षणमंत्र्यांनी आढावा बैठकीत वास्तविक नियंत्रण रेषेवरील चिनी सैन्याच्या कोणत्याही प्रकारच्या आक्रमक वृत्तीला उत्तर देण्यासाठी सैन्य दलाला पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे. आतापासून भारत सीमेचे रक्षण करण्यासाठी वेगवेगळ्या धोरणात्मक पद्धतींचा अवलंब करेल. पूर्वेकडील लडाख व इतर क्षेत्रातील चीनच्या कोणत्याही हल्ल्याचा सामना करण्यासाठी भारतीय सैन्याला पूर्ण तयारी करण्यास सांगण्यात आले आहे.
हवाई दलाच्या जवानांच्या सुट्या रद्द
सूत्रांच्या माहितीनुसार, हवाई दलाच्या जवानांच्या सुट्टी रद्द करण्यात आल्या आहेत. एअर चीफ मार्शल आर.के.एस भदोरिया यांनी कालच म्हटले होते की, ते कोणत्याही कारवाईसाठी तयार आहेत.
१५ जून रोजी गलवान खोऱ्यात भारताचे कमांडिंग ऑफिसर कर्नल बी.व्ही. संतोष बाबू शहीद झाल्यानंतर भारतीय सैनिकांनी चिनी सैनिकांना चांगलाच धडा शिकवला. भारतीय सैनिकांनी गलवान खोऱ्यात चीनच्या बर्बरतेचा बदला घेतला. भारतीय सैनिकांनी दिलेल्या प्रत्यूत्तरात अनेक चिनी सैनिकांचे मनके मोडले गेले. सूत्रांच्या माहितीनुसार भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये सुमारे २ ते ४ तास चकमक सुरू होती.
इतकेच नाही तर भारतीय सैन्याने गलवान खोऱ्यात चीनचा अतिआत्मविश्वास देखील मोडला. भारतीय जवानांनी दिलेलं उत्तर चीन कधीच विसरणार नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अशी माहिती मिळाली आहे की, गलवान खोऱ्यात एक चिनी कर्नल भारतीय सैन्याने जिवंत पकडला होता. भारतीय सैन्याशी झालेल्या चकमकीत चीनचे ४० ते ५० सैनिक मारले गेल्याची माहिती आहे. पण चीनने अजून याबाबत कोणताही खुलासा केलेला नाही.