COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंदूर : भय्यू महाराज यांच्यावर इंदूरमध्येच अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यापूर्वी इंदूरच्या सर्वोदय आश्रमात भय्यू महाराज यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेता येणार आहे. पार्थिवाचं अंत्यदर्शन बुधवारी सकाळी ९ ते १२ यावेळेत सर्वोदय आश्रमात घेता येणार आहे. तर भय्यू महाराज यांच्यावर इंदूरमध्येच अंत्यसंस्कार होणार आहेत, उद्या दुपारी १ वाजता भय्यू महाराज यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. भय्यू महाराज यांचं पार्थिव आज इंदूरमधील बॉम्बे रूग्णालयातच असणार आहे.


भय्यू महाराज यांची आज दुपारी आत्महत्या


अध्यात्मिक गुरू भय्यू महाराज यांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. भय्यू महाराज यांनी इंदूरमध्ये आपल्या राहत्या घरी, एका बंद खोलीत डोक्यावर गोळी झाडली. भय्यू महाराज यांनी स्वत:वर गोळी झाडली, त्यावेळी घरात त्यांची आई असल्याचं सांगण्यात येत आहे. यावेळी एका सहकाऱ्याच्या मदतीने गोळीबाराच्या आवाजानंतर, बंद खोलीचं दार तोडण्यात आलं. तेव्हा भय्यू महाराज यांनी डोक्यात उजव्या बाजूला गोळी झाडल्याचं निदर्शनास आलं. भय्यू महाराज यांना तात्काळ इंदूरमधील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी हलवण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी भय्यू महाराज यांना मृत घोषित केलं. भय्यू महाराजांच्या आत्महत्येचं कारण खाली वाचा.


भय्यू महाराज यांची सुसाईड नोट 


भय्यू महाराज यांची इंग्रजीत लिहिलेली सुसाईड नोट सापडली आहे. 'माझ्या मृत्यूला कुणीही जबाबदार नाही, तणावातून मी आत्महत्या करीत आहे', असं भय्यूजी महाराज यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटलं आहे. भय्यू महाराज ५० वर्षांचे होते.


भय्यू महाराज यांच्या कुटूंबियांची चौकशी होणार


दरम्यान, भय्यूजी यांच्या कुटूंबाची चौकशी होणार असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे, भय्यूजी महाराज यांनी लायसन्स घेतलेल्या पिस्तुलाने आत्महत्या केली असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.


काँग्रेसकडून घटनेच्या सीबीआय चौकशीची मागणी


मध्य प्रदेशात विधानसभा निवडणूक यावर्षी होणार असल्याने राजकीय वातावरण गरम आहे, यात भय्यूजी महाराज यांच्या आत्महत्येची सीबीआय चौकशी करण्यात यावी अशी मागणी, मध्य प्रदेश काँग्रेसचे नेते मानक अगरवाल यांनी केली आहे. भय्यूजी महाराजांच्या भक्त परिवारात मोठ्या प्रमाणात राजकीय मंडळी होती, भय्यू महाराज यांच्या आत्महत्येच्या घटनेनंतर, राजकीय भक्त मंडळीला धक्का बसला आहे. 


भय्यू महाराजांचा वर्षभरापूर्वी दुसरा विवाह


भय्यू महाराज यांनी ३० एप्रिल २०१७ रोजी दुसरा विवाह केला होता, पहिल्या पत्नीच्या निधनानंतर भय्यू महाराज यांनी दुसरा विवाह केला होता, त्यांची दुसरी पत्नी डॉ. आय़ुषी या होत्या. वर्षभरापूर्वी भय्यू महाराज यांनी आत्महत्या केल्यानंतर, अशी घटना घडल्याने सर्वांना धक्का बसला आहे.


मॉडेलिंगनंतर भय्यू महाराज अध्यात्मिकतेच्या वाटेवर


भय्यूजी महाराज हे कधीकाळी मॉडेलिंग करत होते. मॉडेलिंगचं करिअरसोडून त्यांनी अध्यात्मचा रस्ता निवडला. सियाराम शुटिंगचे भय्यूजी महाराज मॉडेल देखील राहिले होते.ते इतर अध्यात्मिक गुरूंपेक्षा अगदी वेगळे होते. ते कधी तरी शेतात काम करताना दिसत होते, तर कधी क्रिकेट खेळताना, घोडेस्वारी आणि तलवारबाजीनेही ते पारंगत होते. 


मध्य प्रदेशातील शाजापूर जिल्ह्यातील शुजालपूर येथे २९ एप्रिल १९६८ रोजी भय्यू महाराज यांचा जन्म झाला, त्यांच्या चाहत्यांची अशी भावना होती की, त्यांना श्री दत्त प्रसन्न आहेत, महाराष्ट्रात त्यांना राष्ट्र संत देखील काही लोक मानतात. भय्यूजी सूर्याची देखील उपासना करता, अनेक तास जलसमाधी घेण्याचा देखील त्यांना अनुभव होता.


महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव यांच्याशी त्यांचे जवळचे संबंध होते. भाजपा अध्यक्ष नितीन गडकरी, संघ प्रमुख मोहन भागवत अशी मंडळी देखील त्यांना मानत होती.


भय्यूजी महाराज ग्लोबल वॉर्मिंगने देखील चिंतेत होते. यासाठी त्यांनी गुरू दक्षिणेच्या नावावर झाडं देखील लावले होते. असं म्हणतात की आतापर्यंत भय्यूजी महाराज यांनी १८ लाख झाडं लावली होती. आदिवासी जिल्हा देवास आणि धारमध्ये त्यांनी जवळ जवळ १ हजार तलाव खोदले होते, ते समारंभात नारळ, शॉल आणि फुलांचे हार स्वीकारत नसतं.