देशातील सध्याची परिस्थिती पाहून गांधीजींच्या आत्म्याला यातना होत असतील- सोनिया गांधी
इतरांनी काहीही दावे करावेत, पण गांधींजींच्या विचारांचे अनुकरण करणारा काँग्रेस हा एकमेव पक्ष असल्याचे सोनियांनी सांगितले.
नवी दिल्ली: देशाची सध्याची परिस्थिती पाहून महात्मा गांधीजींच्या आत्म्याला यातना होत असतील, असे वक्तव्य काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केले. गांधी जयंतीनिमित्त बुधवारी त्यांनी राजघाटावर जाऊन महात्मा गांधी यांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी केलेल्या छोटेखानी भाषणात त्यांनी म्हटले की, गेल्या काही वर्षांमध्ये देशात घडत असलेल्या गोष्टी पाहून महात्मा गांधीजींचा आत्मा दु:खी होत असेल. भारत आणि गांधी या दोन्ही गोष्टी परस्परांशी एकरुप अशा आहेत. मात्र, हल्ली काही लोकांकडून भारताला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी एकरुप करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा टोला सोनिया गांधी यांनी लगावला.
स्वत:ला सर्वोच्च समजणाऱ्यांना महात्मा गांधीजी यांनी केलेल्या त्यागाची किंमत कशी कळणार? तसेच अपप्रचाराचे राजकारण करणाऱ्यांना गांधीजींचे अहिंसेचे तत्वज्ञान पटणार नाही, असेही सोनिया यांनी म्हटले.
यावेळी सोनिया यांनी काँग्रेस पक्ष अजूनही महात्मा गांधीजींनी आखून दिलेल्या मार्गावर वाटचाल करत असल्याचा दावा केला. इतरांनी काहीही दावे करावेत, पण गांधींजींच्या विचारांचे अनुकरण करणारा काँग्रेस हा एकमेव पक्ष असल्याचे सोनियांनी सांगितले.
तत्पूर्वी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि राहुल गांधी यांनीदेखील राजघाटावर जाऊन महात्मा गांधीजी यांच्या समाधीचे दर्शन घेतले. गांधी जयंतीच्या मुहूर्तावर आजपासून मोदी सरकारच्या प्लॅस्टिकमुक्त भारत या अभियानाचाही शुभारंभ झाला.