नवी दिल्ली : गेल्या वर्षी समोर आलेल्या एका सामूहिक बलात्कार प्रकरणाला पोलिसांच्या चौकशीत वेगळच वळण मिळालंय. दिल्लीतल्या अमन विहार भागात ही घटना घडली होती. आरोपींकडून वीस लाख रुपये घेऊन आई-वडिलांनीच आपल्या अल्पवयीन मुलीचा सौदा केला होता, असं पोलीस तपासात पुढे आलंय. आरोपींकडून यासाठी आई-वडिलांनी पाच लाख रुपये अॅडव्हान्सही घेतला होता. यानंतर पीडित मुलीवर कोर्टात आपला जबाब बदलण्यासाठी दबाव टाकणं सुरू होतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्या पालकांनीच आपला सौदा केल्याचं लक्षात आल्यानंतर पीडित अल्पवयीन मुलीला जोरदार धक्का बसला. आरोपींकडून आई-वडिलांनी घेतलेल्या रक्कमेपैंकी 4 लाख 96 हजार रुपये चुपचाप काढून या मुलीनं ही रक्कम पोलिसांकडे सोपवली... आणि आपल्या आई-वडिलांच्या कृत्याचा भांडाफोड केला. 


ही गोष्ट समजल्यानंतर या मुलीला तिच्या पालकांकडून मारहाणही करण्यात आली. यानंतर पोलिसांनी मुलीच्या तक्रारीनंतर आईला अटक केलीय... तर तिच्या वडिलांसोबत इतर आरोपी फरार आहेत. या प्रकरणात आई-वडिलांसोबत पाच जणांवर कट रचणं, धमकी देणं, प्रलोभनं दाखवणं आणि कोर्टात चुकीची माहिती देण्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. आरोपींमध्ये प्रॉपर्टी डीलर सुनील शाही आणि चंद्रभूषण पांडे यांचा समावेश आहे.  


या अल्पवयीन मुलीच्या जिवाला धोका असल्यानं तिला सध्या चिल्ड्रन होममध्ये धाडण्यात आलंय.