Jammu Kashmir : `त्या` कारमध्ये सापडल्या संशयास्पद गोष्टी; पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन
कारच्या धडकेमुळे झालेल्या स्फोटानंतर तणावाच्या वातावरणात आणखी वाढ
श्रीनगर : जम्मू-काश्मीर येथील बनिहालमध्ये दहशतवादी हल्ला घडवण्याचा कट असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शनिवारी या परिसरात झालेल्या स्फेटानंतर सुरु असणाऱ्या तपासानंतर ही दाट शक्यता वर्तवण्यात आली. तपास यंत्रणांना अमोनियम नायट्रेट आणि जिलेटिनच्या कांड्या घटनास्थळी सापडल्या आहेत. त्यामुळे आणखी एका मोठ्या हल्ल्याचे संकेत मिळाले आहेत. बनिहालमध्ये शनिवारी सकाळी सँट्रो कार सीआरपीएफच्या बसला मागून धडकली. यात सँट्रोमधील सिलेंडरचा स्फोट होऊन गाडी जळून भस्मसात झाली, मात्र कोणतीही जीवितहानी झाली नाही. तर सीआरपीएफच्या बसचं थोडंसं नुकसान झालं होतं.
सँट्रोमध्ये यूरिया, तेलाची बाटली आणि एक एलपीजी सिलेंडर आढळून आला. या स्फोटामुळे संशयाचं वातावरण निर्माण झालंय. दरम्यान सँट्रो गाडीचा चालक फरार असून, पोलीस याप्रकरणीचा अधिक तपास करत आहेत. फेब्रुवारी महिन्यात साआरपीएफ जवानांच्या बसच्या ताफ्यावर अशाच प्रकारे घडवून आणलेल्या एका आत्मघाती हल्ल्यात अनेक जावानंना त्यांचे प्राण गमवावे लागले होते.
पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन
एकिकडे बनिहालमध्ये झालेल्या या स्फोटानंतर तणावाचं वातावरण पाहायला मिळालं. तर दुसरीकडे जम्मू काश्मिरच्या पूंछमधील मनकोट आणि कृष्णाघाटी सेक्टरमध्ये शनिवारी रात्री पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं. यात एक नागरीक गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. भारताकडूनही पाकिस्तानच्या या गोळीबारास प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. २६ फेब्रुवारीला भारतानं पाकिस्तानच्या हद्दीत घुसून बालाकोटमधील दहशतवादी तळ उद्धवस्थ केले होते. त्यानंतर पूंछ आणि राजौरी जिल्ह्यात पाकिस्तानकडून सतत शत्रसंधीचं उल्लंघन करण्यात येत आहे. २६ फेब्रुवारीपासून आतापर्यंत तीन भारतीय जवान शहीद झाले असून, सात नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे.