बंगळुरूमधील ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचा सर्व स्तरातून निषेध होत असताना याला वेगळेच राजकिय वळण मिळाले आहे. याप्रकरणी आता भाजप आमदाराचे वादग्रस्त वक्तव्य समोर आले आहे.  
गौरी लंकेश यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपाविरोधात लिखाण केले नसते तर कदाचित आज त्या जिवंत असत्या, असे भाजप आमदार आणि माजी मंत्री डी. एन. जीवराज म्हटले. त्यांच्या या विधानानंतर वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काँग्रेसच्या सत्ताकाळात आम्ही संघाच्या कार्यकर्त्यांना मरताना पाहिले. त्यांच्या हत्यांनंतर गौरी लंकेश यांनीही त्यांच्याविरोधात लिखाण केले. तसे लिखाण त्यांनी केले नसते तर कदाचित आज त्या जिवंत असत्या. गौरी लंकेश या माझ्या बहिणीसारख्या आहेत. पण ज्या पद्धतीने त्यांनी भाजप आणि संघाविरोधात लिखाण केले ते साफ चुकीचे होते, असेही ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यावर सर्व बाजून टिका होत आहे. 
दरम्यान, शृंगेरी येथील काँग्रेस कार्यकर्त्यांनी जीवराज यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
विरोधकांच्या टीकेनंतर जीवराज यांनी मी असे वक्तव्य केले नसल्याचे म्हटले आहे. प्रसारमाध्यमांनी माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला आहे, असे स्पष्टीकरण त्यांनी दिल्याचे ‘द हिंदू’ने दिलेल्या वृत्तात दिले आहे. 


'हत्येचा मी निषेधच केला'


सिद्धरामय्या सरकारने याआधी झालेल्या हत्यांच्या प्रकरणांत योग्य तपास करून आरोपींना गजाआड केले असते तर लंकेश यांची हत्या झालीच नसती अशी स्पष्टोक्ती जीवराज यांनी जोडली. तसेच  मागील काळात झालेल्या हत्यांचा छडा लावण्यात सिद्धरामय्या सरकार अपयशी ठरले आहे, हेच मला म्हणायचे होते. उलट लंकेश यांच्या हत्येचा मी निषेधच केला आहे, असे स्पष्टीकरण त्यांनी दिल्याचे वृत्तात म्हटले आहे.