नवी दिल्ली: गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेले राजस्थानमधील सत्तानाट्य अखेर संपुष्टात आले आहे. राजस्थान विधानसभेत शुक्रवारी मांडण्यात आलेला विश्वासदर्शक ठराव गेहलोत सरकारने जिंकला. राजस्थानचे कायदे आणि संसदीय कार्य मंत्री शांति कुमार धारीवाल यांनी आज विशेष अधिवेशनाला सुरुवात झाल्यानंतर राज्य विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडला. या प्रस्तावावर झालेल्या चर्चेवेळी काँग्रेस नेत्यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. मध्य प्रदेश, मणिपूर आणि गोव्याप्रमाणे केंद्र सरकारला राजस्थानमधील सरकार पाडायचे होते. मात्र, राजस्थानमध्ये हा प्रयत्न असफल ठरल्याची टिप्पणी संसदीय कामकाज मंत्री शांती धारीवाल यांनी केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सभागृहातील जागा बदलल्यानंतर सचिन पायलट यांचा हजरजबाबीपणा, म्हणाले...

या चर्चेनंतर विश्वासदर्शक ठरावावर आवाजी मतदान झाले. यामध्ये गेहलोत सरकारने बहुमत सिद्ध केले. त्यामुळे काँग्रेस सरकारवरील गंडांतर टळले आहे. सचिन पायलट यांच्या बंडामुळे राजस्थानमधील काँग्रेस सरकार अडचणीत आले होते. ते पक्षातून बाहेर पडल्यास काँग्रेसमधील१९ आमदार त्यांच्या पाठिशी होते. त्यामुळे गेहलोत सरकार अडचणीत आले होते. मात्र, काही दिवसांपूर्वी दिल्लीत राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्याशी चर्चा केल्यानंतर सचिन पायलट यांनी बंडांची तलवार म्यान केली. यावेळी पक्षश्रेष्ठींकडून सचिन पायलट यांच्या तक्रारींचे निवारण केले जाईल, असे आश्वासन देण्यात आले. यानंतर पायलट आपल्या समर्थक आमदारांसह जयपूरमध्ये परतले होते.