ऑफिसमध्ये कर्मचाऱ्यांना अचानक आजारी पडल्याने किंवा आपल्या नियोजित गोष्टींसाठी सुट्टीची गरज असते. जर तुम्ही सुट्टीचा ई-मेल करत असाल तर त्याचं कारण सांगणं अपेक्षित असतं. पण कोणतंही कारण न सांगता थेट सुट्टी मागणं ही पद्धत तशी प्रचलिच नाही. पण आताची नवी पिढी मात्र याबाबतीत फारच बिनधास्त दिसते. अशाच प्रकारे एका क्रमचाऱ्याने आपल्या बॉसला सुट्टीसाठी पाठवलेला ई-मेल व्हायरल झाला आहे. यानंतर पिढीनुसार बदलत जाणाऱ्या कामाच्या ठिकाणचे संवाद यावरुन सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुंतवणूकदार सिद्धार्थ शाह यांनी एक्सवर पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये कर्मचाऱ्याने कोणतंही कारण न देता, थेट सुट्टी घेत असल्याचं सांगून टाकलं आहे. यानंतर कर्मचाऱ्याने सुट्टी मिळण्यासाठी आधी विनंती करायला हवी होती का? तसंच कामच्या ठिकाणी स्वातंत्र्य आणि प्रोफेशनलिझम यांचा मेळ कसा घालायला हवा याची चर्चा रंगली आहे. 


सिद्धार्थ शाह यांनी एक्सवर ई-मेलचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. "माझी Gen Z टीम मला कशाप्रकारे मला अप्रोच करते," असं त्यांनी पोस्ट शेअर करताना कॅप्शन लिहिली आहे. ही पोस्ट व्हायरल झाली असून, करोडोंमध्ये व्हूज मिळाले आहेत. मेलमध्ये कर्मचाऱ्याने लिहिलं आहे की, "हाय सिद्धार्थ, मी 8 नोव्हेंबर 2024 ला सुट्टीवर असेन, बाय". विशेष म्हणजे मेलमध्ये कुठेही विनंती करत असल्याचं दिसत नाही. याउलट फक्त कळवण्याच्या हेतूने मेल करण्यात आल्याचं स्पष्ट दिसत आहे. 


या ईमेलने सोशल मीडियावर चर्चा सुरु केली असून, युजर्स विभागले आहेत. अनेकजण कर्मचाऱ्याच्या थेट स्वभावामुळे आश्चर्यचकित झाले आहेत. कामाच्या ठिकाणी बदलत चाललेलं वातावरण आणि संवादाची बदलती शैली यातून प्रतिबिंबित होत आहे.  एका युजरने लिहिं आहे की, "जर मी माझ्या मॅनेजरला हा मेसेज पाठवला असता, तर त्यांनी माझ्या वागणुकीशी संबंधित समस्यांवर चर्चा करण्यासाठी एचआरसोबत मीटिंग ठेवली असती".


एका युजरने लिहिलं आहे की, "सर्वोत्तम बाब म्हणजे ते तुम्हाला सुट्टीवर आहोत आणि विचारु नका असं सांगतात". "माझ्या Gen z टीम सदस्यांपैकी एकाने अचानक एका आठवड्याची रजा टाकली होती. तो प्रोजेक्टचा महत्त्वाचा काळ होता म्हणून मी कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पण तो सांगत नव्हता. नंतर कळलं त्याचं ब्रेकअप झालं होतं आणि हे विसरण्यासाठी डोंगरावर जायचं होतं," असं एका युजरने सांगितलं. 


दुसरीकडे, काहींनी असं थेट सांगणं सामान्य केलं पाहिजे असं मत मांडलं आहे. एका युजरने लिहिलं, "हा थेट मेसेज आहे. पण ते चांगले आणि औपचारिक दिसण्यासाठी किमान एआय वापरायला हवे होते." "हे सामान्य करा. लोकांना सुट्टी घ्यायची असेल तर कारणं सांगण्याची गरज नाही. तो त्यांचा अधिकार आहे," असं एक युजर म्हणाला.