नवी दिल्ली - माजी केंद्रीय संरक्षण मंत्री, देशातील कामगार संघटनांचे खंबीर नेते जॉर्ज फर्नांडिस यांचे मंगळवारी निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते. गेल्या अनेक वर्षांपासून जॉर्ज फर्नांडिस आजारपणामुळे सक्रिय राजकारण आणि समाजकारणापासून दूर होते. समता पक्षाची स्थापना करण्यात आणि त्याआधी जनता दल पक्षाच्या विस्तारात जॉर्ज फर्नांडिस यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. देशातील कामगारांना त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देण्यासाठी, शोषितांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जॉर्ज फर्नांडिस यांनी आपले संपूर्ण आयुष्य दिले. अत्यंत साधी राहणी आणि संघटन कौशल्य हे जॉर्ज फर्नांडिस यांचे वैशिष्ट्य होते. एकेकाळी एका हाकेवर संपूर्ण मुंबई बंद करण्याची ताकद केवळ जॉर्ज फर्नांडिस यांच्याकडेच होती.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

६० ते ८० च्या दशकांत जॉर्ज फर्नांडिस यांनी देशातील कामगारांना एकत्र करून त्यांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले होते. पहिल्यापासून देशातील गरिब, शोषित आणि पीडितांबद्दल जॉर्ज फर्नांडिस यांना कणव होती. त्यांना समानतेचे अधिकार मिळाले पाहिजेत, यासाठी त्यांनी सर्व मार्गांचा अवलंब केला होता. माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात जॉर्ज फर्नांडिस यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये महत्त्वाची भूमिका निभावली होती. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे ते निमंत्रकही राहिले होते. त्याचबरोबर रेल्वे, संरक्षण आणि उद्योग या प्रमुख मंत्रालयांचा कारभार त्यांनी सांभाळला होता. 


जॉर्ज फर्नांडिस यांचा जन्म ३ जून १९३० रोजी मंगलोरमध्ये झाला. १९४९ मध्ये जॉर्ज फर्नांडिस मुंबईमध्ये आले. त्यानंतर त्यांनी समाजवादी संघटनेमध्ये रुजू होऊन कामगारांच्या प्रश्नांवर आवाज उठविण्यास सुरुवात केली. १९६० ते १९८० या काळात त्यांनी मुंबईतील विविध कामगारांसाठी अनेकवेळा संप पुकारला होता. १९७४ मध्ये त्यांनी पुकारलेला रेल्वेचा संप त्याकाळी खूप गाजला होता. १९६७ मध्ये दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे एस. के. पाटील यांना पराभूत करून जॉर्ज फर्नांडिस पहिल्यांदा संसदेत गेले. १९७५ मध्ये तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी जाहीर केल्यावर त्यांनी त्याविरोधात आवाज उठविला होता. यावेळी ते भूमिगतही झाले होते. 


केंद्रात रेल्वे मंत्री असताना कोकण रेल्वे प्रकल्पांची मुहूर्तमेढ त्यांनीच रोवली होती. या प्रकल्पासाठी ते कायम आग्रही होते. भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या कारगिल युद्धावेळी त्याचबरोबर पोखरण येथील अणुचाचणीवेळी जॉर्ज फर्नांडिसच केंद्रात संरक्षण मंत्री होते. १९६७ ते २००४ या काळात त्यांनी तब्बल नऊवेळा लोकसभेच्या निवडणुका जिंकल्या होत्या.