Crime News : देशभरात मोठ्या उत्साहात दिवाळीचा (Diwali 2023) सण साजरा करण्यात येत आहे. न्यायालयाने वेळ ठरवून दिल्यानंतरही आदेश धुडकावून लावत नागरिकांनी मोठ्या प्रमाणात फटाके फोडले आहेत. यामुळे काही ठिकाणी आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत. अशातच उत्तर प्रदेशातून (UP Crime) एक हादरवणारी घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये फटाक्यांमुळे एका 40 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. फटाक्यांसाठी बनवलेल्या ट्यूबमध्ये दारु भरून त्याच्या गुप्तांगाजवळ स्फोट केल्याने हा माणूस जखमी झाला आणि जमिनीवर पडला. त्यानंतर या व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गाझियाबादमधून दिवाळीच्या दिवशीच ही धक्कादायक घटना समोर आली आहे. अफसल अन्सारी असे या मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. अफसलच्या गुप्तांगाजवळ लोखंडी रॉडमध्ये दारु भरून स्फोट केल्याने त्याचा मृत्यू झाला. दिवाळीच्या रात्री हा सगळा प्रकार घडला आहे. लोक दिवाळी साजरी करत असताना एका व्यक्तीने अफसलच्या मागे लोखंडी रॉडमध्ये दारु भरून स्फोट केला. त्यामुळे त्याच्या पायाच्या नसा फुटल्या आणि त्यातून खूप रक्त वाहू लागले. त्याच अवस्थेत अफसलला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.


गाझियाबादच्या लिंक रोड पोलीस ठाण्याच्या परिसरात दिवाळीच्या रात्री उशिरा ही घटना घडली. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. व्हिडीओमध्ये घनश्याम शाळेजवळ काही तरुण उभे असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. दरम्यान, तेथून दोन व्यक्ती हातात पिशव्या घेऊन जातात. त्यानंतर शाळेजवळ रस्त्यावर उभ्या असलेल्या याच तरुणांपैकी एका तरुणाने तेथून जाणाऱ्या अफसलच्या मागून खासगी भागाजवळ फटाक्यांनी भरलेल्या नालद्वारे स्फोट केला. मोठा स्फोट झाल्यानंतर अफसल अचानक जमिनीवर कोसळला. 



हा सगळा प्रकार घडल्यानंर अफसलच्या शरीरातून रक्त वाहू लागलं आणि त्याला गंभीर जखमा झाल्या. अफसलच्या अंगातून भरपूर रक्त वाहून गेलं होतं. त्याला तात्काळ एमएमजी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तिचे पोहोचताच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दरम्यान, पाठीमागून येऊन स्फोट करणाऱ्या तरुणाचे नाव प्रदीप आहे. सध्या आरोपी फरार असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.


कसा केला जातो स्फोट?


'नाल' हा एक कच्चा पोकळ लोखंडी रॉड आहे ज्यामध्ये लोक एका टोकाला दारु भरतात. या भरलेल्या दारुचा स्फोट होण्यासाठी जोरात तो रॉड जमिनीवर मारतात. लोक लोखंडी रॉडच्या एका टोकाला हँडल जोडतात आणि पट्टीच्या दुसर्‍या टोकाला भरलेल्या दारुचा स्फोट करण्यासाठी मागून जोरात दाबतात.