नवी दिल्ली : सोमवारी काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीत झालेल्या वादावार गुलाम नबी आझाद यांनी मौन सोडलं आहे. काँग्रेसच्या २३ नेत्यांनी सोनिया गांधींना लिहिलेलं पत्र बाहेर आल्यामुळे काँग्रेसच्या बैठकीत जोरदार खडाजंगी झाली. पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष असावा आणि पक्षाचा अध्यक्ष संपर्कात असावा, अशी मागणी करणारं पत्र या २३ नेत्यांनी सोनिया गांधींना लिहिलं होतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीवेळी रनिंग कॉमेंट्री करणे हा बेशिस्तपणा नव्हता का? पत्र लिहिण्यावरून आमच्यावर टीका करणारे बेशिस्तपणे वागत नव्हते का? त्यांच्यावर कारवाई व्हायला नको का? आम्ही कोणावरही टीका केली नाही, असं गुलाम नबी आझाद म्हणाले आहेत. 



आम्ही लिहिलेलं पत्र बाहेर आलं, तर त्यात एवढी मोठी गोष्ट काय आहे? पक्ष मजबूत करणं आणि निवडणुका घेणं, याची मागणी करणं यात गुप्तता काहीच नाही. इंदिरा गांधींच्या काळातही मंत्रिमंडळातल्या घडामोडी लिक होत होत्या, अशी प्रतिक्रिया गुलाम नबी आझाद यांनी दिली. 



सुरुवातीला राहुल गांधींना या पत्राविषयी काही आक्षेप होते. सोनिया गांधी आणि राहुल गांधींनी एका महिन्यात पक्षात निवडणुका होतील, असं सांगितलं. पण कोरोनामुळे निवडणुका घेणं शक्य नाही, त्यामुळे आम्ही पुढचे ६ महिने सोनिया गांधींनीच अध्यक्ष राहावं, अशी विनंती केली, असं वक्तव्य गुलाम नबी आझाद यांनी केलं आहे. 


काँग्रेसला सक्रीय करणं हीच इच्छा असल्यामुळे २३ जणांनी पत्र लिहिलं. १९७० नंतर काँग्रेस बनवण्यातले आम्ही आहोत. निवडणुकांबाबत ज्यांना माहिती नाही, ते आमच्यावर टीका करत असतील, तर याचं दु:ख जास्त आहे. आम्ही बऱ्याच पंतप्रधान आणि राष्ट्रपतींसोबत काम केलं आहे, त्यामुळे आमच्यात काहीतरी असेल. जे लोक काहीच करून आले नाहीत, ते विरोध करत आहेत, असंही आझाद म्हणाले. 


ज्यांना काँग्रेसमध्ये खरंच रस आहे, ते आमच्या बोलण्याचं स्वागत करतील. सध्या सत्ताधारी पक्ष मजबूत आहे. जर काँग्रेसला ५० वर्ष विरोधी पक्षात बसायचं असेल, तर पक्षांतर्गत निवडणुका घेऊ नका, असं विधान गुलाम नबी आझाद यांनी केलं आहे. 


राहुल गांधींनी या २३ नेत्यांनी लिहिलेल्या पत्राबाबत बैठकीत नाराजी व्यक्त केली होती. सोनिया गांधी रुग्णालयात असताना हे पत्र पाठवण्यात आलं, या पत्राच्या वेळेवरून राहुल गांधींनी बैठकीत आक्षेप नोंदवले होते.