अयोध्या : गेल्या अनेक दिवसांपासून रामजन्मभूमिपूजनाचा कार्यक्रम कधी संपन्न होणार याची चर्चा रंगली होती. आज अखेर तो दिवस आला आणि ऐतिहासिक क्षणासाठी अयोध्यानगरी सज्ज झाली आहे. या भव्य दिव्य अशा कार्यक्रमामध्ये अनेक नेतेमंडळी संतमहंत उपस्थित राहणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज राम मंदिराचा भूमिपूजन सोहळा पार पडणार आहे. सध्या अयोध्येत सर्वत्र रामनामाचा जयघोष होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, उद्योगपती आणि अशोक सिंहल फाउंडेशनचे कार्यकर्ते महेश भाग चंदका यांनी सर्व पाहुण्यांना दहा ग्रॅम चांदीची नाणी भेट देण्याचं जाहीर केलं आहे. यासंबंधीत माहिती रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी दिली आहे.


पाहुण्यांना भेट स्वरूपात देण्यात येणाऱ्या चांदीच्या नाण्याची महत्त्वाची गोष्टी म्हणजे नाण्याच्या एका बाजूला प्रभू श्रीराम, लक्ष्मण, सीता आणि हनुमान यांचं छायाचित्र असेल. तर दुसऱ्या बाजूला राम मंदिर ट्रस्टचं चिन्ह असणार आहे.


चांदीच्या नाण्यासोबतचं कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या पाहुण्यांना एका डब्यात लाडूही देण्यात येणार आहेत. त्यासाठी मोठ्या संख्येत याठिकाणी लाडू तयार करण्याचे काम सुरू आहे. या लाडूंना रघुपती लाडू म्हणूनही ओळखलं जातंय. 


या सोहळ्यादरम्यान सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. तसंच या परिसरात जाण्यासाठी निमंत्रण पत्रिकांवर हाय सिक्युरिटी कोड देण्यात आला आहे. या द्वारेच संबंधित व्यक्तीला भूमिपूजनाच्या ठिकाणी प्रवेश दिला जाणार आहे. यामध्ये १३५ संत-महंतांचा समावेश आहे.